6वृत्तसंस्था/ मुंबई
वानखडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शारीरिकदृष्टय़ा योग्य प्रकारे सावरणे आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वावर भर दिला आहे. शुक्रवारी शमीने 17 धावांत 3 गडी टिपून ऑस्ट्रेलियाला 188 धावांवर रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आमची योजना प्रयत्न सोपे ठेवण्याची होती. आम्ही संघाच्या बैठकीत चांगली सुरुवात करणे, चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकणे आणि आमचा टप्पा व दिशा यांना चिकटून राहणे यावर चर्चा केली होती, असे ‘बीसीसीआय टीव्ही’वर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सहकारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसह बोलताना त्याने म्हटले आहे. उष्णता ही देखील एक समस्या होती. जेव्हा आम्ही पहिला स्पेल टाकला तेव्हा हवामान उष्ण होते. पण नंतर वारा वाहू लागल्यावर गोलंदाजी करणे थोडे चांगले झाले, असे शमीने सांगितले.
अहमदाबादमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत खेळल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी या 32 वर्षीय खेळाडूला पहिल्या एकदिवसीय सामन्याचा सराव चुकवावा लागला होता. अहमदाबाद कसोटीत 40 षटके टाकल्यानंतर मला सावरण्यासाठी 1-2 दिवस हवे होते. मी व्यवस्थित सावरलो आणि सामन्यासाठी आलो, असे त्याने सांगितले. व्यवस्थापनानेही मान्य केले की, मी सावरण्याची गरज आहे. आम्ही इतके सामने खेळलो आहोत की, आम्हाला आमचे कौशल्य आणि क्षमता माहीत आहे. त्यामुळे अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही योग्य प्रकारे सावरणे महत्त्वाचे आहे, असे तो म्हणाला.









