येत्या आठ दिवसांत काम पूर्ण करण्याची सूचना
बेळगाव : कोनवाळ गल्ली परिसरातील मनपा कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढला. याची दखल घेऊन मनपाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांनी लागलीच समस्यांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी कोनवाळ गल्लीतील खोदण्यात आलेला रस्ता आणि अर्धवट असलेल्या डेनेजची माहिती घेऊन कंत्राटदारांना विविध सूचना केल्या. महापालिकेच्या विभागीय कार्यालयालगत असलेल्या परिसरात सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. विविध समस्यांच्या विळख्यात हा परिसर अडकला असल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सोमवारी जनावरांसह मनपा कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. याची दखल घेऊन साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांनी लागलीच कोनवाळ गल्ली परिसरात फेरफटका मारला. तसेच जलवाहिनी खोदण्यात आलेल्या रस्त्याची तसेच गटारीची पाहणी केली. त्यानंतर सर्व्हिस रस्त्यावर घालण्यात येत असलेल्या डेनेज वाहिनीच्या कामाची पाहणी करून कंत्राटदाराला संपर्क साधून कामाच्या पूर्ततेबाबत विचारणा केली. तसेच येत्या आठ दिवसांत काम पूर्ण करण्याची सूचना सचिन कांबळे यांनी केल्या.









