फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशनचे काम अंतिम टप्प्यात
बेळगाव / प्रतिनिधी
सांबरा येथील बेळगाव विमानतळाला नवे पंख मिळणार आहेत. पायलट होण्यासाठीचे फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ)चे काम अंतिम टप्प्यात असून, सुरक्षा यंत्रणांकडून परवानगी मिळाल्यानंतर रेडबर्ड प्रा. लि. बेळगावमधून आपली सेवा सुरू करणार आहे. यामुळे बेळगाव हे एक वैमानिक प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयाला येणार आहे.
बेळगाव विमानतळासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून दोन एफटीओंना मंजुरी मिळाली. दिल्ली येथील रेडबर्ड व बेंगळूर येथील समवर्धने या दोन कंपन्यांना ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर 5 हजार चौरस फुटाची जागा देण्यात आली. प्रशिक्षण केंद्रापासून मुख्य धावपट्टीपर्यंत टॅक्सी ट्रक उभारण्यात आला. यामुळे प्रशिक्षण केंद्राचे एअरक्राफ्ट येणे-जाणे सोयीचे होईल.
रेडबर्ड कंपनीने पावसाळय़ापूर्वी हँगर उभारणीच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु जोरदार पावसामुळे हे काम रखडले होते. मागील दोन महिन्यांत हँगर उभारणीच्या कामाला गती आली. नुकतेच शेडचे काम पूर्ण झाले असून, सुरक्षा यंत्रणांची परवानगी मिळाल्यानंतर रेडबर्ड आपली सेवा सुरू करणार आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत बेळगावमध्ये खासगी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होईल, असा अंदाज आहे. यामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. शनिवारी विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी रेडबर्डच्या हँगरला भेट देऊन माहिती जाणून घेतली.









