सकल मराठा परिवारातर्फे आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी
मागील 66 वर्षांपासून बेळगावसह 865 गावांमधील मराठी भाषिक अन्यायाविरोधात लढा देत आहेत. 1 नोव्हेंबर रोजी हे नागरिक काळादिन पाळून भाषिक प्रांतरचनेला विरोध दर्शवितात. या लढय़ाला पाठिंबा देण्यासाठी सीमाप्रश्न लवकर निकालात काढून महाराष्ट्रात सामील करा, या आशयाची निवेदने सकल मराठा परिवारातर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्हय़ांच्या तहसीलदार तसेच इतर अधिकाऱयांना देण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या आवाहनानुसार सकल मराठा परिवाराचे दिनेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हय़ात निवेदन देण्यात आले. अमरावती, गोंदिया, धुळे, नांदेड, पालघर, वर्धा, यवतमाळ, रायगड, परभणी, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बुलढाणा, सांगली, पुणे, ठाणे, नांदेड, सोलापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, सातारा, जळगाव, बिड, अकोला, जालना यासह इतर जिल्हय़ातील जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकांऱयांमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.
सीमावासियांना न्याय देऊन त्यांचा वनवास दूर करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच काळय़ादिनाला पाठिंबा देत महाराष्ट्रातील विविध शहरात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्रातील मराठा समाज सीमावासियांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.









