मुलांच्या जीवाशी खेळः, पालकांकडून टॉवर हटविण्याची मागणी
वार्ताहर/ उसगांव
बाराजण उसगांव येथील सरकारी प्राथमिक शाळेजवळ एका रात्रीत उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरला पालकांनी जोरदार विरोध केलेला आहे. या मोबाईल टॉवरमुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भिती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा टॉवर तेथून हटविण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.
त्यासंबंधीचे लेखी निवेदन उसगांव ग्रामपंचायतील देण्यात आले असून त्याच्या प्रती फोंडा भागशिक्षणाधिकारी, उपजिल्हाधिकारी केंद्रीय शिक्षण विभाग पणजी व फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी मिळून एकूण 80 विद्यार्थी तसेच शिशूवाटिकेत 25 असे 105 विद्यार्थी शिकत आहेत. मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे लहानमुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भिती पालकांनी या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
पंचायत, शाळेला अंधारात ठेवून कुणी टॉवर उभारला?
शाळेजवळ एका रात्रीत उभारलेल्या या टॉवरला उसगांव पंचायतीने ना हरकत दाखला दिलेला नाही, अशी माहिती पंचायतीने पालकांना दिली आहे. स्थानिक पंच सदस्यांनीही आपल्याला त्याबाबत कुठलीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शाळा, पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांना अंधारात ठेवून याठिकाणी मोबाईल टॉवर उभारला जात आहे. हा टॉवर खासगी जमिनीत उभारला जात असला तरी निदान शाळेत शिकणाऱया लहान मुलांच्या आरोग्याचा विचार होणे गरजेचे होते, असे शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे.
पैशांसाठी मुलांच्या जीवाशी खेळू नका
खासगी जागेत मोबाईल टॉवर उभारल्यामुळे जमिनी मालकाला पैसे मिळणार, सरकारलाही त्यातून कर स्वरुपात महसूल उपलब्ध होणार, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रेडिएशनमुळे कर्करोगासारखे घातक रोग होऊ शकतात याची पूर्ण जाणीव असूनही जमिन मालक व सरकारने शाळेला लागून टॉवर उभारण्यास परवानगी कशी दिली याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
शाळेच्या 300 मीटरच्या परिघात दोन टॉवर्स
मोबाईल टॉवर शाळा, विद्यालयांपासून 300 मीटरच्या परिघात असू नये. कायद्याने त्याला बंदी असतानाही पूर्वी उभारण्यात आलेला एक टॉवर शाळेपासून 60 मीटरच्या अंतरावर असून सध्या उभारण्यात आलेला टॉवर अगदी शाळेच्या जवळ आहे. मोबाईल टॉवर ही काळाची गरज व सध्याच्या संगणक तंत्रज्ञान युगात अत्यावश्यक असले तरी माणसाच्या जीवावर उठून अशा गोष्टींना परवानगी देता येणार नाही. याठिकाणी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे ही गोष्ट लक्षात घेऊन तो शाळे पासून काही अंतरावर दूर दुसऱयाजागी उभारण्याची मागणी पालकांनी केली आहे.
मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन…
शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी संबंधित खात्यांना सादर केलेल्या लेखी निवेदनात हा मोबाईल टॉवर दुसऱया जागी हलविण्याची मागणी केली आहे. सरकारने त्याबाबत गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कृती केल्यास स्वागतच आहे. पण सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिलेला आहे. त्यासाठी उसगांवातील नागरिक, मराठी पेमी व सर्व पालकांना या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन शाळेच्या पालकांनी केले आहे.









