कर्नाटकची बस महाराष्ट्रात सुसाट, प्रवाशांना प्रतीक्षा लालपरीची : वातानुकूलित बससेवेलाही प्रवाशांचा प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवेला दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. बेळगाव बसस्थानकातून सर्व प्रकारची बससेवा महाराष्ट्रात धावत आहे. त्यामुळे सीमाभागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कर्नाटकची बस महाराष्ट्रात सुरू झाली आहे. मात्र महाराष्ट्राची बस कर्नाटकात कधी सुरू होणार? असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित होत आहे. कोरोना, लॉकडाऊन आणि कर्मचाऱयांच्या संपामुळे बससेवेवर परिणाम झाला होता. पण आता कर्नाटकची बस महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे धावत असली तरी महाराष्ट्राची लालपरी अद्याप कर्नाटकात दाखल झाली नाही.
मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर, मुंबई, नाशिक, ठाणे, सोलापूर, जोतिबा, रत्नागिरी, विशालगड, पंढरपूर आदी ठिकाणी बसेस धावत आहेत. शिवाय प्रवाशांचा प्रतिसाददेखील वाढत असल्याने बसफेऱयांमध्ये वाढ होणार आहे. तसेच रात्रीच्या प्रवासासाठी धावणाऱया वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे बेळगाव विभागाच्या महसुलात वाढ होण्याची अशा आहे.
कोरोना, लॉकडाऊन व इतर कारणांनी कर्नाटक-महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या बससेवेवर परिणाम झाला आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र कर्मचाऱयांनी आंदोलन छेडल्याने लालपरीची सेवा विस्कळीत झाली आहे. शिवाय कर्नाटकच्या बस महाराष्ट्रात धावत असल्या तरी अद्याप लालपरीची कर्नाटकात एन्ट्री झाली नाही. त्यामुळे सीमाभागातील प्रवासी लालपरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे दररोज 350 हून अधिक बस धावत होत्या. मागील दोन वर्षांत कोरोना, लॉकडाऊन व इतर कारणांनी कर्नाटक-महाराष्ट्र मंडळांना प्रचंड फटका बसला आहे. मध्यंतरी बससेवा जाग्यावर थांबून होती. त्यामुळे प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न थांबले होते. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले होते. विशेषतः बेळगाव विभागाचे उत्पन्न हे महाराष्ट्रात धावणाऱया बससेवेवर अवलंबून आहे. मात्र अधिक उत्पन्न मिळवून देणारी कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद राहिल्याने अडचणी वाढल्या होत्या.









