कोरोना काळानंतर पंढरीत दीर्घकाळाने कार्तिकी वारी होत आहे. अवघे जग ठप्प झाले होते. आषाढीला देवशयनी एकादशीला देव झोपी गेले त्यानंतरचा गेल्या दीड वर्षाचा कालखंड हाहाकार माजवणारा होता. माणसांना त्यांच्या मर्यादा दाखवणारा व भानावर आणणारा होता. अक्षरशः जगभर होत्याचे नव्हते झाले पण परिस्थिती सुधारली व दिवाळीला ज्ञानाचा, आरोग्याचा, समृद्धीचा नवा दिवा लागला. या पार्श्वभूमिवर गेले दोन दिवस अमरावती, मालेगाव, नांदेड येथील जातीय दंगली आणि धर्माच्या नावाखाली सुरू असलेला अधर्म संतापजनक आहे. जनसामान्यांना वेठीस धरुन बंद, दगडफेक, जाळपोळ व सुडाचे हिशोब साधण्यात काहींनी तारतम्य सोडले आहे. धर्म म्हणत-म्हणत अधर्म करणे आणि निधर्मी म्हणत जातीय राजकारण करणे असा पायंडाच अलीकडे काही वर्षात रुढ झाला आहे आणि तो होण्यामागे मताची पेटी, सातव्या वेतन आयोगाच्या नोकऱयांचे राजकारण आणि सत्तेचे गणित कारणीभूत आहे. जातदांडगे, धर्मदांडगे, धनदांडगे त्यांचेच सर्व साधणार, लहान जाती-धर्म समुदाय दुर्लक्षित होणार हे स्पष्ट दिसते आहे. एकीकडे ठरावीक मंडळी श्रीमंत, अतिश्रीमंत होत आहेत तर बाकी दुर्बल, गरीब या वर्गात ढकलली जात आहेत. देशहित, लोकहित यापेक्षा स्वहित व जातहित याचे महत्त्व वाढते आहे. दुर्लक्षित, मागास, गरीब माणसांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. ती जबाबदारी आहेच पण त्यातून मताची पोळी आणि धनदांडगेपण जपले जात असेल तर एकूण व्यवस्थेचा फेरविचार केला पाहिजे. त्रिपुरात काही दुर्घटना घडली त्यांचे पडसाद मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये कशासाठी. एखाद्या घटनेचा निषेध, निवेदन, मागणी, चौकशी हे समजू शकते पण जाळपोळ, दगडफेक, लुटालूट कशासाठी या प्रश्नाची तर्कसंगत उत्तरे मिळणारी नाहीत. या प्रश्नांची उत्तरे राजकारण, मताची पेटी यातच सामावली आहेत आणि लोकशाही बळकट करायची असेल तर असे प्रयत्न लोकांनी हाणून पाडले पाहिजेत. विदेशात काही घडले किंवा परराज्यात काही अप्रिय झाले तर त्यातून काही चांगले शिकणे गरजेचे असते. पण गावोगावचे पुढारी एक निवेदन तयार करुन जिल्हाधिकाऱयांना देतात आणि सेल्फी किंवा फोटो काढून समाज माध्यमात मिरवतात. काहींचा तो धंदाच झाला आहे. मागे सिरियात अशी एक घटना घडली होती. एका छोटय़ा गावातील सरपंचाने दहा-वीस माणसे गोळा करून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी तयारी केली व जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकाऱयांनी त्या सगळय़ा ग्रामस्थांना तुम्हाला सिरिया माहिती आहे काय? तिथे कधी गेला आहात का? तुमच्या गावचे तेथे कोणी आहे का असे विचारले. अर्थात उत्तर नाहीच होते. मग संतापून जिल्हाधिकारी म्हणाले, तुमच्या गावचे इतके प्रश्न आहेत, तुमचे शेतीचे इतके प्रश्न आहेत ते सोडून हा उद्योग का करत आहात हसत-हसत उत्तर आले, फेसबुकवर फोटो टाकण्यासाठी. असे धंदे बंद केले पाहिजेत. जातीय, धार्मिक राजकारण करणाऱया कुणालाही लोकांनी बाजूला ठेवले पाहिजे. देशाची प्रगती साधायची तर पंढरीत पांडुरंगाचे वारकरी जसे भेदाभेद अमंगळ म्हणत एकमेकांना भेटतात, मदत करतात, एकत्र चालतात, लहान-थोर असा भेद पाळत नाहीत आणि सर्व जाती-धर्मांचे लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी चराचराच्या सुखासाठी एकत्र येतात तोच भाव जपला पाहिजे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत नरहरी असे सारे संत तेच सांगून गेले. पण आपण संतांना जात चिकटवून मेळावे, सभा, राजकारण करण्यात गुंग आहोत. जनसामान्य अशा गोष्टींना प्रतिसाद देतात हे लक्षात येताच बनेल राजकारणी त्यांचा लाभ उठवतात म्हणून जनतेनेच देशहित, सार्वहित यांना सर्वोच्च स्थान देत संकुचित, स्वार्थी व हिंसेवर पोसलेले पुढारी व राजकारण फेकले पाहिजे. पंढरीच्या वारीचा तोच अर्थ आहे. त्रिपुरात काही अप्रिय घटना घडली, म्हणून त्यांची शिक्षा देशभरातील निरपराध लोकांना देणे चुकीचे आहे. अमरावतीत मुस्लीम समाजाने मोर्चा काढला. शक्तीप्रदर्शन केले, मोर्चातील काहींनी दगड मारत पोलिसांना आणि गावातील काहींना वेठीस धरले. मग ओघाने अश्रूधूर, लाठीहल्ला, निषेध, बंद, सभा, प्रतिक्रिया आल्या आणि ते लोण फिरू लागते. यामागे नक्कीच षड्यंत्र असते. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या दंगलीची पाळेमुळे खणू आणि दोषीवर कडक कारवाई करु असे म्हटले असले आणि त्यांना स्व. बाळासाहेब देसाईंचा वारसा असला तरी महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या स्तरावर पोहोचले आहे हे वेगळे सांगायला नको. मुंबई दंगलीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीचे राजकीय कनेक्शन आणि शंभर-शंभर कोटींच्या वसुलीची जबाबदारी आणि रोज सुरु असलेली चिखलफेक पाहता अमरावती, नांदेड दंगलीनंतर मूळ शोधले जाईल व गुन्हेगारांना शासन होईल असे मानायला कुणीही तयार नाही. आजवर मिरज, मालेगाव, भिवंडी वा सोलापूर असो किंवा कोणतीही दंगल असो त्यातील आरोपी शोधला व त्याला कायद्याच्या फासात लटकवला असे झालेले नाही. अशा दंगलीचा फक्त राजकीय लाभ उठवला जातो. काही राज्याच्या निवडणुका आहेत आणि महाराष्ट्रात मुंबईसह काही महापालिका व विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत. आता कोरोना व्हायरस आटोक्यात आला. पण जातीय, धार्मिक व्हायरसवर लस शोधली पाहिजे. समान नागरी कायदा, आर्थिक मागासांना संधी आणि धार्मिक गोष्टी उंबऱयाच्या आत बाकी सर्व भेदाभेद टाकून समानता, समरसता, मानवता, बंधुभाव हे करावेच लागेल. वरवरचे उपाय रोगावर परिणामकारक इलाज ठरू शकणार नाहीत. कदाचित काही दंगेखोरांना आणि लुटारुना शिक्षा होईल पण कायमस्वरुपी इलाज होणार नाही. रोगाचे मूळ शोधले पाहिजे आणि जालीम परिणामकारक औषध दिले पाहिजे.
Previous Articleसगुण, निर्गुण दोन्ही विलक्षण
Next Article ‘बीटकॉईन’मध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई निश्चित
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








