मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
बीटकॉईन प्रकरणात सहभागी असलेल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिला. बेंगळुरातील विधानसौध येथे पत्रकारांशी ते बोलत होते. या प्रकरणात कोणाला संरक्षण देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही निःपक्षपातीपणे चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करू. जो कोण यात सहभागी असेल त्याला अटकही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, काँग्रेस नेत्यांकडे पुरावे असल्यास ते ईडीसह कोणत्याही तपास यंत्रणेकडे कागदपत्रे देण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात कोणाचाही सहभाग असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दोघे-तिघे असल्याचे सांगणे योग्य नसून यात सहभागी असलेल्यांची नावे उघड करावीत, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्य आणि राष्ट्रपातळीवर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपीला सोडून दिलेल्यांकडून आम्हाला धडा शिकण्याची गरज नाही. काँग्रेस नेते आमच्या पक्षावर कोणते पुरावे घेऊन आरोप करीत आहेत. 2018 पासून सदर प्रकरण उघडकीस आले आहे. पण काँग्रेस सरकार सत्तेवर असताना कारवाई का केली नाही. त्यावेळीच कारवाई करणे तुमच्याकडून का शक्य झाले नाही, असा प्रश्न मुख्यमंत्री बोम्माई यांनी उपस्थित केला.









