पंतप्रधानांचे ‘व्हर्च्युअल’ मार्गदर्शन- अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘जनऔषधी दिवसा’च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 7,500 व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना भारतनिर्मित लस देशवासियांबरोबरच जगासाठीही असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. ‘व्हर्च्युअल’ प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होत पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी ट्विट करत यासंदर्भात माहितीही दिली. जनऔषधी केंद्रांमुळे सामान्य कुटुंबांची प्रतिवर्ष 50 हजार कोटी रुपयांची बचत होत असल्याचा दावाही पंतप्रधानांनी याप्रसंगी केला.
जनऔषधी दिवसाच्या निमित्ताने देशाला 7 हजार 500 वे जनऔषधी केंद्र समर्पित करताना आनंद होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पैसे नाही, म्हणून कोणीही औषधांपासून वंचित राहू नये, यासाठी जनऔषधी केंद्रांची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण देश मला माझ्या परिवारासारखा आहे. तुम्ही आजारी असाल, तर माझे कुटुंबीय आजारी असल्यासारखे मला वाटते. म्हणून आरोग्य आणि औषधांच्या अधिकाधिक उत्तमोत्तम सोयी, सुविधा आपल्याला देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतनिर्मित लसी जगासाठीही वरदान
कोरोना संकटाशी लढण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीसाठी शास्त्रज्ञ काम करत होते. मात्र, भारतात लसनिर्मिती झाल्याने आपला देश सध्या जगासाठी औषधाचे केंद्र बनले आहे. ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या भारतात बनविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसी केवळ भारतीयांसाठी नाही, तर ती जगासाठीही आहे. जागतिक स्तरावर सर्वांत स्वस्त कोरोना लस भारतातून पुरवली जात आहे. खासगी रुग्णालयात कोरोना लसीची किंमत केवळ 250 रुपये आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.









