वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथे बुधवारी घेण्यात आलेले विधानसभेचे मतदान शांततेत पार पडले. मतदान 73 टक्के झाले असून विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे 13 तारखेला मतमोजणी दिवशी कळणार आहे. कंग्राळी बुद्रुक येथे एकूण 13 मतदान बुथ होते. यामध्ये मराठी प्राथमिक शाळेमध्ये 4 बुथ, कन्नड प्राथमिक शाळेमध्ये 7 बुथ तर माध्यमिक हायस्कूलमध्ये 2 बुथ ठेवण्यात आले होते. गावामध्ये 12,212 एकूण मतदान आहे. यापैकी 8808 मतदान झाले. बुधवारी सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. सकाळी 7 पासून ते 11 पर्यंत मतदान अगदी धिम्यागतीने सुरू होते. सकाळी 11 नंतर 4 वाजेपर्यंत मतदारांनी एकच गर्दी केली होती. दुपारी 4 नंतर सायंकाळी 6 पर्यंत परत धिम्यागतीने पार पडले. यावेळी वृद्ध दिव्यांग मतदार तसेच आजरी मतदारांना तरुणांनी रिक्षा किंवा दुचाकीवरून व सायकलीवरून आणून मतदान केंद्रापर्यंत नेऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदान केंद्राजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.









