सैन्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण भुयारी मार्ग
वृत्तसंस्था / लेह
देशाच्या सुरक्षा कवचामध्ये आणखी एक अध्याय जोडला जाणार आहे. दुर्गम सीमावर्ती भाग लडाखला काश्मीर आणि उर्वरित देशासाठी जोडणाऱया दोन भुयारीमार्गांचे काम विविध टप्प्प्यांमध्ये पोहोचेल आहे. सोनमर्गमध्ये 6.5 किलोमीटर लांबीचा झेड -टर्न भुयार तयार झाले आहे. तर 14.2 किलोमीटर लांबीच्या जोजिला भुयाराचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे.
जोजिला भुयाराच्या निर्मितीनंर सोनमर्गसोबत लेह-लडाखचा प्रवासही सुलभ होणार आहे. सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण पश्चिम आणि पूर्व सीमेवर पाकिस्तान आणि चीनच्या सैन्य आव्हानाला सामोरे जाण्यास मोठी मदत मिळणार आहे.
आशियातील सर्वात मोठा भुयारीमार्ग
हिमालयाला भारताचा पहारेदार मानले जाते. परंतु हिवाळय़ात प्रचंड हिमवृष्टीमुळे उत्तरेकडील सीमांवर असलेले काश्मीरचे तसेच लडाखमधील सीमावर्ती भागात पोहोचणे अवघड ठरते. याचमुळे आता आशियातील सर्वात मोठय़ा भुयारीमार्गाचे काम वेगाने केले जात आहे. या भुयारीमार्गाच्या निर्मितीनंतर लडाखसाठीचा रस्तेसंपर्क वर्षभर कायम राहणार आहे. या भुयारीमार्गामुळे आपत्कालीन स्थितीत सैन्याला जलदपणे सीमेवर पोहोचता येईल. या भुयारीमार्गातून चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर रणगाडे अन् अवजड शस्त्रास्त्रs सीमेपर्यंत नेता येणार आहेत. देशाच्या सैन्याचे सर्वाधिक मनुष्यबळ पंजाब अन् जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. सध्या जोजिला खिंड पार करण्यासाठी 3-4 तासांचा कालावधी लागतो. भुयारीमार्गामुळे हा प्रवास केवळ 20 मिनिटांचा होणार आहे. यामुळे अत्यंत वेगाने जवानांना तैनात करता येणार असल्याचे जोजिला प्रकल्पाचे प्रमुख हरपाल सिंह यांनी सांगितले आहे.
काम प्रगतिपथावर
14 किलोमीटर लांबीच्या जोजिला भुयाराकरता सध्या खननकार्य वेगाने सुरू आहे. पश्चिम आणि पूर्व दोन्ही बाजूंना खोदकाम सुरू आहे. सुमारे 6 किलोमीटरचे खोदकाम अन् स्टॅब्लिशिंगचे काम पूर्ण झाले आहे. रोड लेइंग, सीसीटीव्ही, वाय-फाय पॉवर, व्हेंटिलेशन आणि ड्रेनेजसह सर्व कामे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.
टीबीडी बोरिंग तंत्रज्ञानाचा वापर
टनल बोरिंगसाठी टीबीडी बोरिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे भुयारीमार्गाची निर्मिती करताना दुर्घटनेची शक्यता मोठय़ा प्रमाणात कमी होते. या प्रकल्पात कार्यरत कामगार अन् इंजिनियर्सच्या सुरक्षेसाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. जोजिला भुयारीमार्गासाठी 6800 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 2004 मध्ये या भुयारीमार्गाची कल्पना मांडण्यात आली होती. तर 2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह या प्रकल्पाच्या कार्याचा शुभारंभ केला होता. परंतु काम सुरू होण्यापूर्वीच सत्तांतर झाले होते. यानंतर 2018 मध्ये नवा प्रकल्प अहवाल आणला गेला, ज्यात भुयार दोन टप्प्यांमध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात झेड-टर्न भुयार (6.5 किलोमीटर) पूर्ण झाले असून आता 14.2 किलोमीटर लांबीच्या जोजिला भुयारीमार्गाचे काम सुरु आहे.









