बेंगळूर
: सोमवारपासून देशांतर्गत प्रवासी विमानसेवा सुरू झाली आहे. विमानसेवा सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी 5 वर्षाच्या चिमुरडय़ाने एकटय़ानेच दिल्ली ते बेंगळूर प्रवास केल्याची घटना घडली. मुलगा सुखरुप परतताच त्याच्या आईने त्याला कवटाळले.
लॉकडाऊनमुळे बालक विहान शर्मा हा दिल्लीतील आजोळी अडकून पडला होता. त्यामुळे तो मागील दोन महिन्यांपासून आई-वडिलांची भेट कधी घडणार, या प्रतीक्षेत होता. विमानसेवा प्रारंभ होताच त्याने एकटय़ाने विमानप्रवास करत बेंगळूर गाठले. इकडे केंपेगौडा विमानतळावर वाट पाहत असलेली त्याची आई मंजीत शर्मा यांना मुलगा दाखल होताच अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनीच त्याला घरी नेले.
सोमवारी बेंगळूरमध्ये दिल्लीतून पहिले विमान दाखल झाले. मात्र आजी-आजोबांना नातूसमवेत येणे शक्य झाले नाही. इतकेच नव्हे, तर एकदा बेंगळूरला आल्यानंतर पुन्हा दिल्लीला जाणे कठीण होते. मात्र, आई-वडिलांकडे जाण्यासाठी हट्ट धरलेल्या विहानने एकटय़ानेच बेंगळूरला जाण्याचे धाडस दाखविले. तत्पूर्वी विहानच्या पालकांनी विमानोड्डाण अधिकाऱयांकडे विनंती केली होती. त्याला अधिकाऱयांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.
विमानातील 100 पेक्षा अधिक प्रवाशांमध्ये 5 वर्षीय विहान देखील होता. विशेष श्रेणीतून प्रवास करण्यासाठी त्याला अधिकाऱयांनी परवानगी दिली होती. हातात ग्लोज, चेहऱयाला मास्क, हातात ‘स्पेशल कॅटेगरी’ असा बोर्ड धरलेला विहान सुखरुपपणे बेंगळूरला येताच त्याच्या आईने त्याला मिठीत घेतले. विमानोड्डाण खात्याच्या अधिकाऱयांनी मुलाच्या प्रवासासाठी परवानगी दिल्याबद्दल विहानच्या आईने आभार मानले.









