वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या एप्रिल ते जून दरम्यानच्या तिमाहीमध्ये विविध भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये 47 हजार 870 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहिती नॅस्कॉमच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. यामध्ये फिनटेक कंपन्यांमध्ये जवळपास 26 टक्के इतकी गुंतवणूक दिसून आली आहे.
याचप्रमाणे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये 19 टक्के, एंटरप्रायझेस टेकमध्ये 16 टक्के, रिटेल टेक कंपन्यांमध्ये 9 टक्के, एडटेक कंपन्यांमध्ये 8 टक्के आणि हेल्थटेक कंपन्यांमध्ये 5 टक्के इतकी गुंतवणूक झाली आहे.
उद्योग मंडळ नॅस्कॉम यांच्या अहवालामध्ये वरील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जून 2022 तिमाहीअखेर एकंदर 47 हजार 870 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये सिकोया, कॅपिटल, टायगर ग्लोबल, अल्फा वेव आणि एसेल यांनी विविध क्षेत्रांमध्ये सहाहून अधिक करार केले असल्याची माहिती समोर आली आहे. टायगर ग्लोबलने आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी 40 टक्के गुंतवणूक फिनटेक क्षेत्रामध्ये केली असल्याचे दिसले आहे. सिकोया कॅपिटलने एंटरप्रायझेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात 25 टक्के आणि फिनटेक क्षेत्रात 20 टक्के गुंतवणूक केली आहे.
चार कंपन्या बनल्या युनिकॉर्न
एप्रिल ते जूनच्या तिमाहीमध्ये चार स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न बनल्या असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये नियो बँकिंग फर्म ओपन, लिड स्क्वेयर्ड, एडटेक स्टार्टअप फिजिक्सवाला आणि ऑनलाईन ब्युटी प्रोडक्ट प्लॅटफॉर्म पर्पल डॉट कॉम यांचा समावेश आहे. याआधीच्या म्हणजेच जानेवारी ते मार्च दरम्यानच्या तिमाहीमध्ये 16 स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न बनल्या आहेत. एप्रिल ते जून 2022 च्या कालावधीमध्ये भारतीय टेक्नॉलॉजी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक 17 टक्के घटून 6 अब्ज डॉलर्स इतकी राहिली होती.









