उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत मालवली
मुंबई
प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंग यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. भूपिंदर यांची पत्नी मिताली यांनी याबाबत माहिती दिली असून भूपिंदर यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोटाच्या आजारामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते येथील क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याचदरम्यान रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली.
भूपिंदर सिंग यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी पंजाबमधील पटियाला येथे झाला होता. ते बॉलिवूडमधील नावाजलेले गायक असून त्यांच्या नावावर अनेक हिट गाणी आहेत. ‘हुजूर इस कदर भी न इतरा के चलिए’ या गाण्यामुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यादेखील प्रख्यात गायिका आहेत. पत्नी मिताली यांच्यासोबत त्यांनी गझल गायनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत. भूपिंदर सिंह यांनी बॉलिवूडमधील मौसम, सत्ते पे सत्ता, अहिस्ता अहिस्ता, दुरीयाँ, हकिकत अशा अनेक चित्रपटातील गाणी गायली आहेत.
भूपिंदर सिंग यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग हे शीख होते. ते स्वतःही खूप चांगले संगीतकार होते. संगीत शिकवण्यात ते अतिशय कडक निष्णात होते. वडिलांच्या कडकपणामुळे सुरुवातीच्या काळात भूपिंदर यांना संगीताचा तिटकारा येत होता. पण पुढे त्यांनी संगीताचे धडे गिरवत अनेक गीते गायिली. प्रसिद्ध गीतकार आणि चित्रपट निर्माते गुलजार यांच्या आवडत्या गायकांपैकी ते एक होते. सुरेश वाडेकर यांच्यासोबत त्यांनी गायलेले ‘हुजूर इस कदर भी न इतरा के चलिए’ या गाण्यामुळे आजही संमेलन-कार्यक्रमांमध्ये नवा उत्साह संचारतो.









