प्रतिनिधी/ बेळगाव
28 मार्चपासून दहावीच्या वार्षिक परीक्षेला सुरुवात होणार आहे. यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 33 हजार 807 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे दरवषीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक 943 रिपीटर परीक्षा देणार असून त्यात 656 विद्यार्थी तर 287 विद्यार्थिनी आहेत.
कोरोनामुळे दोन वर्षे दहावीच्या परीक्षेचा पुरता बोजवारा उडाला होता. कोविड नियमांचे पालन करण्यासाठी परीक्षा पद्धत बदलून ‘मल्टीपल चॉईस’ पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. पण यंदा पुन्हा जुन्याच पद्धतीने दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून यावेळी 33 हजार 807 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून त्यात 17 हजार 118 विद्यार्थी तर 16 हजार 689 विद्यार्थिनींचा सहभाग असेल. 138 केंद्रांमधून 493 शाळांचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
गेली दोन वर्षे दहावीच्या परीक्षांबाबत गोंधळ निर्माण झाला होता. यंदा खात्याने नेटके नियोजन केल्याचा दावा जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी केला. पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना विविध पातळय़ांवर मार्गदर्शन केले जात आहे. 100 टक्के निकालाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.









