बीजिंग
कोरोना लॉकडाऊनच्या कारणामुळे चीनमध्ये 2020 मध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती तेथील संशोधकांनी दिली आहे. कोरोनाच्या काळामध्ये निर्बंध लावण्यात आल्यामुळे हवा प्रदूषणमुक्त राहिल्याने पावसाचे प्रमाण चीनमध्ये वाढल्याचे दिसले आहे. उन्हाळय़ाच्या दिवसात झालेल्या विक्रमी पावसात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता व लक्षावधी लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. संशोधकांनी या संदर्भामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याच्या कारणाचा नुकताच सविस्तर अभ्यास केला होता. कोरोना निर्बंधामुळे वायूचे प्रदूषण बऱयाच प्रमाणामध्ये कमी झाले होते. त्यामुळेच चीनच्या पूर्वोत्तर भागांमध्ये 2020 मध्ये जून-जुलैच्या काळात मोठय़ा प्रमाणात पूर आला होता. यांगत्झी या नदीला 1961 नंतर प्रथमच मोठय़ा प्रमाणामध्ये पूर आल्याचे दिसून आले. 79 टक्के इतके पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. गेल्या चार दशकापासून चीनच्या पूर्व आणि मध्य भागांमध्ये उन्हाळय़ाच्या दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते पण आता पुन्हा पावसाचे प्रमाण या भागात वाढले असल्याचे दिसले आहे.









