पेट्रोल गळतीमुळे अनेक वाहनांना आग, दाट धुक्यामुळे दुर्घटना
वृत्तसंस्था/ कैरो
इजिप्तमध्ये एका भीषण रस्ते अपघातात एकामागून एक अशी अनेक वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला. तर 60 जण जखमी झाले. इजिप्तची राजधानी कैरोपासून 132 किलोमीटर अंतरावर असलेल्या बहेरा भागात हा अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तम होत आहे. एका कारमधून पेट्रोल गळती झाल्यानंतर अनेक वाहनांची टक्कर झाल्यामुळे वाहनांनी पेट घेतल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांसह वाहने रस्त्याच्या कडेला जळताना दिसत आहेत.
ईजिप्तमध्ये घडलेला हा अपघात शनिवारी सकाळी कैरो आणि भूमध्यसागरीय शहर अलेक्झांड्रियाला जोडणाऱ्या महामार्गावर झाला. पहाटेच्यावेळी मार्गावर दाट धुके असल्यामुळे एकामागून एक अनेक वाहने आदळल्याने त्यांना आग लागली. सुरुवातीला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. यानंतर अन्य वाहनांची बसला धडक बसली. इजिप्तच्या हवामान प्राधिकरणाने एका दिवसापूर्वी महामार्गांवर दाट धुक्मयाचा इशारा दिला होता, असे स्थानिक माध्यमांच्या अहवालात म्हटले आहे.









