अंदमानमधील शार्क, हिमालयातील फूल, कर्नाटकातील डान्सिंग फ्रॉग सामील
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील जीवजंतूंच्या 29 प्रजाती धोक्यात सापडल्या आहेत. या जीवजंतूंच्या प्रजातींना इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टमध्ये सामील करण्यात आले आहे. यातील तीन जीवांवर सर्वाधिक धोका आहे. व्हाइट चीक्ड डान्सिंग फ्रॉग, अंदमान स्मूथहाउंड शार्क आणि येलो हिमालयीन फ्रिटिलरीचा यात समावेश आहे.
अवैध शिकार, प्रदूषण, हवामान बदल आणि आजार ही या जीवजंतूंच्या प्रजाती संकटात सापडण्याची प्रमुख कारणे आहेत. आययुसीएनची रेड लिस्ट जगातील जैववैविध्याची स्थिती दर्शविते. पृथ्वीवरील कुठल्या जीवजंतूंच्या प्रजातींना धोका निर्माण झाला आहे किंवा ते विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत हे या रेडलिस्टमुण्s लक्षात येते. या संस्थेशी जगभरातील 15 हजारांहून अधिक वैज्ञानिक जोडले गेले आहेत. भारतातील रोपं, प्राणी आणि फंगसच्या 9472 प्रजातींपैकी 1355 प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. यातील काही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत असे या संस्थेने म्हटले आहे.
यंदा भारतात 239 प्रजातींच्या जीवजंतूंची स्थिती पडताळून पाहिली गेली, यातील 29 जीवजंतूंच्या प्रजातींना धोका असल्याचे सांगण्यात आले. मानवी हालचालींमुळे जीवजंतूंची अवस्था खराब होत आहे. त्यांचे प्रमाण सातत्याने कमी होत चालले आहे. ही स्थिती अशाचप्रकारे सुरू राहिलयास पृथ्वीवरील अनेक जीवजंतू संपुष्टात येतील असे आययुसीइनचे संचालक ब्रूनो ओबेर्ल यांनी म्हटले आहे. 7-19 डिसेंबरपर्यंत कॅनडाच्या माँट्रियलमध्ये आययुसीएनची परिषद होत असून यात 196 सदस्य सामील झाले आहेत. यात भारताचेही सदस्य आहेत.
आययुसीएनचे सर्व वैज्ञानिक मिळून जैववैविध्याचा आराखडा तयार करत आहेत, तसेच महत्त्वाकांक्षी करार करत निसर्गाला होत असलेले नुकसान रोखण्याचे पाऊल उचलले जाणार आहे. कर्नाटकात आढळून येणारा व्हाइट-चीक्ड डान्सिंग फ्रॉग आता 167 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात अत्यंत फारच कमी प्रमाणात आढळून येत आहे. कॉफीच्या बागांसाठी जंगलतोड होत असल्याने बेडकांची ही प्रजाती संकटात सापडली आहे. या बेडकांचा अधिवासच संपुष्टात आला आहे.
30 टक्के डान्सिंग फ्रॉगची प्रजाती धोक्यात असूनही सरकार त्यांच्या संरक्षणाकरता कुठलेच पाऊल उचलत नाही. प्रदूषण, आजार, घुसखोर प्रजाती आल्याने आणि तापमानवाढीमुळे ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे उद्गार जीजीएस इंद्रप्रस्थ विद्यापीठचे वाइल्डलाइफ बायोलॉजिस्ट डे. सुमित डूका यांनी काढले आहेत.
अंदमान स्मूथहाउंड शार्क देखील संकटात आहे. हे शार्क अंदमान समुद्र, पूर्व हिंदी महासागर, म्यानमार, थायलंडमधील बेटांनजीक आढळून येतात. हे शार्क ज्या खोलीवर राहतात, तेथे सर्वाधिक मासेमारी केली जात आहे. हा शार्क छोटय़ा आकाराचा असतो. याचा शोध मागील वर्षीच लागला होता, तेव्हा याला अंदमान स्मूथहाउंड फिश नाव देण्यात आले होते. या शार्कची शिकार मोठय़ा प्रमाणात होत असल्याने याच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे.
यलो हिमालयीन फ्रिटिलरी हे अत्यंत सुंदर फूल असते. याची शेती योग्यप्रकारे केली जात असल्याने याच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. आययुसीएनच्या रेड लिस्टमध्ये आता 1,50,388 प्रजाती सामील आहेत. यातील 42,108 प्रजाती विलुप्त होण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचल्या आहेत. 17,903 प्रजातींपैकी 1,550 हून अधिक सागरी जीव तसेच वृक्ष असून त्यांचे अस्तित्व संपण्याच्या मागांवर आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक प्रभाव सागरी जीवांवर पडत आहे. या यादीत 41 टक्के जीव हे सागरी आहेत.









