प्रतिनिधी/ पणजी, म्हापसा
गोवा पोलीस व पर्यटन विभागाच्या पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत कळंगूट पोलीस स्थानकाच्या हद्दित 28 दलालांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. वाळपई, डिचोली, कोलवाळ आणि पर्यटन विभागाचे 60 हून अधिक साध्या वेषातील पोलीस दलालांना पकडण्यासाठी तैनात करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलिसांच्या अथक परिश्रमाने दलालांना ताब्यात घेण्यात आले. नंतर कळंगूट पोलिसांनी त्यांना रितसर अटक करून पुढील कारवाईसाठी पर्यटन संचालनालयासमोर हजर केले, असे वाल्सन यांनी सांगितले.
काल शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निधीन वाल्सन बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपविभागीय अधिकारी विश्वेश कर्पे, पर्यटन संचालक सुनील अंचिपका उपस्थित होते. कारवाईबाबत महासंचालक तसेच पयर्टनमंत्र्यांना निवेदन सादर केले होते. अशाप्रकारची कारवाई यापुढेही सुऊच राहणार असल्याची माहिती वाल्सन यांनी दिली.
अलीकडेच कळंगूट किनारी भागाची पाहणी केलेल्या पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कळंगूटमध्ये दलाल पर्यटकांची लुबाडणूक करत असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच कळंगूटचे पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला होता. तर कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी कळंगूट पोलीस चांगले कार्य करीत असल्याचा दावा केला होता.
दिवस-रात्र सुरु होती मोहीम
शुक्रवारी पहाटे सुरु झालेली ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरु होती. यावेळी कळंगूट परिसरात येणाऱ्या पर्यटकांना स्वत:कडे आकर्षित करुन त्यांना विविध आमिषे दाखविण्याच्या प्रयत्नात असताना सर्व दलालांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण परप्रांतीय असून गोव्यात वास्तव्य कऊन आहेत. यात नेपाळ, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आसाम, कर्नाटक, हरयाणा, ओरिसा, उत्तराखंड, मेघालय आदी राज्यातील नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्यावर पर्यटन व्यवसाय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर 50 हजार दंड
पर्यटकांना लुबाडणाऱ्या या दलालांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. कायद्यात त्यांना 5 हजार ते 50 हजारपर्यंत दंड निश्चित केलेला आहे. हे दलाल पुन्हा पर्यटकांना लुबाडताना आढळल्यास 50 हजार दंड देण्यात येईल. यापुढेही कारवाई अशीच सुरु राहणार आहे, अशी माहिती पर्यटन सचिव अहुजा यांनी दिली.
वेश्याव्यवसाय दलाल का सापडत नाहीत?
कळंगूट समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय सुऊ असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास दलाल फिरत असतात. मोबाईलवर मुलींचे फोटो दाखवून लडकी चाहिये क्या? अशी विचारणा करतात. काही नामांकीत हॉटेल्समध्येही हा व्यवसाय सुऊ असल्याची चर्चा किनारी भागात सुऊ आहे. कालच्या मोहिमेत हे दलाल का सापडले नाहीत? फक्त कळंगूटमध्येच न फिरता अन्य ठिकाणीही ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









