30 लाखांचा ड्रग्ज जप्त , दोन रशियन संशयिताना अटक
प्रतिनिधी/ पणजी
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने गोव्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश केला असून 4.88 लाख रुपये रोख रकमेसह 30 लाख रुपये किमतीचा विविध प्रकारचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात दोन रशियन संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक 1980 ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती महिला जलतरणपटू आहे तर दुसरा रशियातील माजी पोलीस कर्मचारी आहे, अशी माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या दोन आठवड्यांत एनसीबीच्या गोवा विभागाने ही कारवाई केली होती, असेही ते म्हणाले.
रशियन ड्रग्जमाफिया गोव्यातील हरमल व त्याच्यालगतच्या भागात सक्रियपणे कार्यरत असल्याची माहिती एनसीबीच्या पोलिसांना मिळाली होती. त्याच्याआधारे, चौकशी सुरू करण्यात आली होती. गुप्तचरच्या माहितीनुसार, एस. वर्गानोव्हा नावाची एक रशियन महिला परदेशी नागरिकांना ड्रग्ज पुरवित असल्याचे आढळून आले होते. तपासादरम्यान आकाश नावाच्या स्थानिक व्यक्तीची ओळख पटली होती, असेही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आकाश एका मोठ्या नेटवर्कचा भाग होता आणि तो रशियन ड्रग्ज माफियांचा प्रमुख म्हणून काम करणाऱ्या रशियन व्यक्तीच्या आदेशांनुसार काम करत होता, त्यानंतर आकाशच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली होती. आकाशच्या हालचालांवरून आंद्रे नावाच्या रशियन नागरिकाला पकडण्यात आले. त्याच्याकडून 20 एलएसडी ब्लॉट्स जप्त करण्यात आले. त्याची सखोल तपासणी केली असता त्याने आपल्या स्थानिक निवासस्थानी हायड्रोपोनिक गवत उगवत असल्याचे उघड केले. त्यानंतर त्याच्या घरातून हायड्रोपोनिक गवताच्या झाडाची भांडी जप्त करण्यात आली, असे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
संपूर्ण कारवाईदरम्यान 88 एलएसडी ब्लॉट्स, 8.8 ग्रॅम कोकेन, 242.5 ग्रॅम चरस, 1.440 किलो हायड्रोपोनिक विड, 16.49 ग्रॅम हॅश ऑइल, 410 ग्रॅम हॅश केक यासह विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 4.88 लाख ऊपये रोख रकमेसह 30 लाख रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. एनसीबीने भारतीय आणि विदेशी चलने, बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे आणि हायड्रोपोनिक गवत वाढवण्यासाठी लागणारी सामग्री देखील जप्त केली आहे.
अटक करण्यात आलेली रशियन महिला, एस वर्गानोव्हा ही 1980 च्या जलतरणात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती आहे, तर आंद्रे हा रशियाचा माजी पोलीस आहे. गोव्यात दीर्घकाळापासून ड्रग्ज व्यवसाय तो चालवत होता. त्याने आपले नेटवर्क पसरवण्यासाठी अनेक शहरांना भेटी दिल्या होत्या व ड्रग्ज पॅडलर्सच्या माध्यमातून ड्रग्जव्यवसाय हाताळत होता, असेही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एनसीबी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









