केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्र्यांची घोषणा.
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये 4-जी नेटवर्क सेवा सुरू होईल, असे दूरसंचार राज्यमंत्री देव़ुसिंह चौहान यांनी शनिवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना चांगले काम करण्यासाठी सतत प्रेरणा देत असल्याने देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच ‘मन की बात’ कार्यक्रम देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सद्यस्थितीत देशातील अनेक गावांमध्ये दूरसंचार नेटवर्क पोहोचलेले नाही. सुमारे 38 ते 40 हजार गावांमध्ये सिग्नल पोहोचत नाही. त्याचसाठी दूरसंचार क्षेत्र अधिकाधिक गतिमान करण्यासाठी आम्ही 2024 पर्यंत 4-जी नेटवर्कचे जाळे गावा-गावापर्यंत व्यापण्याचे ध्येय निश्चित केले असल्याचे चौहान यांनी सांगितले.
2024 पर्यंत सर्व वंचित गावे 4-जी नेटवर्कने कव्हर केली जातील. देशातील बहुतांश गावांमध्ये 4-जी नेटवर्क पोहोचल्यामुळे सामाजिक-आर्थिक बदल होण्याबरोबरच डिजिटल अंतर कमी होईल. देशातील खेड्यापाड्यात शेवटच्या टोकापर्यंत राहणारे नागरिक डिजिटल पद्धतीने कनेक्ट झाल्यानंतर त्यांना सरकारची जबाबदारी कळू शकेल असे स्पष्ट करतानाच गावांना डिजिटल पद्धतीने जोडणे म्हणजे लोकांना लोकशाही मूल्यांशी जोडणे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै 2022 मध्ये देशभरातील गावांमध्ये 4-जी मोबाईल सेवा पोहोचवण्यासाठी एकूण 26,316 कोटी ऊपयांच्या एका प्रकल्पाला मंजुरी दिली होती. हा प्रकल्प दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील 24,680 गावांमध्ये 4-जी मोबाईल सेवा प्रदान करणार आहे.









