वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूक जूनमध्ये आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात निव्वळ रुपात 13 हजार 667 कोटी रुपये इतकी झाली आहे. कोरोनाची धास्ती भारतासह इतर देशांमध्ये असली तरी भारतीय शेअर बाजार अजुनही विदेशी गुंतवणूकीसाठी महत्त्वाचा आकर्षण ठरलेले आहे, हे यावरून सिद्ध होते.
एफपीआयने दिलेल्या माहितीनुसार 1 ते 18 जूनपर्यंत समभागांमध्ये 15 हजार 312 कोटी घालण्यात आले आहेत तर 1 हजार 645 कोटी रुपये मात्र बाँड बाजारातून काढून घेतले आहेत. त्यामुळे निव्वळ स्वरूपात सदरच्या कालावधीत 13 हजार 667 कोटी रुपयांची गुंतवणूक बाजारात झाली आहे.
तज्ञांच्या मते अमेरिकेतील केंद्रीय बँक 2023 पासून व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात करणार आहे. यामुळे जागतिक स्तरावर विक्रीचा सिलसिला दिसतो आहे. याच कारणास्तव काही प्रमाणात भारतीय बाजारातील समभागांमधून काही गुंतवणूक काढण्यात आल्याचे पहायला मिळाले आहे. तरीही बाजारात विदेशी गुंतवणूकीचा ओघ सुरू राहिला आहे.









