नुकताच आपण लाडक्मया बाप्पांना निरोप दिला. दरवषी येणारी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी दोन कारणांनी महत्त्वपूर्ण असते. या दिवशी पाहुणचाराला आलेले लाडके बाप्पा परत जातात, तर याच दिवशी अनेक भाविक अनंताचे व्रत करतात. त्यामुळेच या दिवसाला अनंत चतुर्दशी असेही म्हटले जाते.
पेशवेकालीन पुण्यात साजऱया केल्या जाणाऱया सार्वजनिक उत्सवात, दसऱयाचे सीमोल्लंघन, गणेशोत्सव आणि होळी हे तिन्ही उत्सव अतिशय भव्य प्रमाणात आणि मोठय़ा उल्हासाने साजरे केले जात असत. या उत्सवांचा सर्व खर्च पेशव्यांचा खजिन्यातून होत असे. विशेष म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळाऐवजी दरवषी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंतचे 10 दिवस, पेशव्यांच्या महालात गणेशोत्सव साजरा होत असे. त्याची आत्तासारखीच मिरवणूक निघत असे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आजच्यासारखीच पुण्यात लोकांची गर्दी होत असे. सन 1893 पासून पुण्यातील सर्व गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे.
गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप छत्रपती शिवाजीराजांनी पुणे येथे दिले असे दाखले इतिहासात मिळतात. त्यांच्या काळात, 1630 ते 1680 पर्यंत उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा केला गेला जात असे. त्या मागील त्यांचा उद्देश स्वराज्य, संस्कृती लोकांना कळावी व त्यांच्यात देशभक्ती जागवावी हा होता. शिवरायांच्या मृत्यूनंतर बंद पडलेली सार्वजनिक गणेशपूजा 1718 पासून पेशव्यांनी पुन्हा सुरू केली व ती प्रथा सन 1818 पर्यंत कायम राखली गेली. पण सार्वजनिक गणपती पूजा पेशव्यांच्या पतनानंतर 1819 ते 1892 या दरम्यान बंद झाली व ती पूजा घरोघरी सुरू झाली.
गणेश ही मंगलतेची देवता असल्याने कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. वैयक्तिक आणि घरगुती स्वरूपाचा हा धार्मिक उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन लढा देण्यासाठी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रचार करून व अनेक मंडळांची स्थापना करण्यास प्रोत्साहन देऊन 1893 मध्ये खऱया अर्थाने सार्वजनिक केला. सार्वजनिक गणपतीची सुरुवात पुण्यापासून सुरू होऊन तो आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोचला आहे. दहा अकरा दिवसांचा हा महोत्सव गेल्या एक शतकापेक्षाही अधिक काळापासून दिमाखात साजरा केला जात असून या महोत्सवाची सांगता म्हणजे विसर्जन मिरवणूक हा फार मोठा इव्हेंट महाराष्ट्रभर विशेषतः मुंबई व पुण्यात फारच मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जाण्याची परंपरा आहे. गणपती भक्त जगभरात असले तरी सार्वजनिकरित्या साजरा होणारा हा जगातील सर्वात मोठा उत्सव असावा. कोरोना विषाणूने सर्व जगालाच विळखा घातला असून विघ्नहर्ता गणपती बाप्पाही त्यातून सुटलेले नाहीत.
यंदाच्या गणेशोत्सवाची दोन मुख्य वैशिष्टय़े होती. एक म्हणजे शून्य ध्वनी प्रदूषण आणि मिरवणुकीशिवाय गणेश विसर्जन. कोरोनाने आणलेल्या बंधनांमुळे ‘मिरवणुकीविना विसर्जन’ हे गेल्या 128 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ आली होती. तत्कालीन ब्रिटिश सरकारने घातलेल्या बंदीला झुगारून गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू असताना 1942 ‘चले जाव’ ही घोषणा दिल्यावर पेटलेले आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी घातली होती. हा बंदी हुकूम मोडत मिरवणूक निघाली होतीच व मिरवणूक काढणाऱयांना सरकारने तुरुंगात टाकले होते. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात दोन वेळा असेच कठीण प्रसंग आले होते. 1961 मध्ये पानशेत धरण फुटल्याने पुण्यातील मुख्य पेठात जलप्रलय झाला होता. तरीही अशा परिस्थितीत पुणेकरांनी गणेशोत्सव साजरा केला होता व विसर्जन मिरवणूकही काढली होती. दुसरा प्रसंग म्हणजे 1965 मधे गणेश चतुर्थीलाच दंगल झाली होती व भारत पाक युद्धही सुरू झाले होते. दंगलीमुळे शहरात कर्फ्यू लावण्यात आला होता व संध्याकाळनंतर मिरवणूक काढण्यास बंदी होती. पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी भारताने युद्ध जिंकल्याची शुभवार्ता आली आणि धूमधडाक्मयात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती.
यंदाच्या गणेशोत्सवाचे दुसरे मोठे वैशिष्टय़ म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे ‘शून्य ध्वनिप्रदूषण’. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूकच नसल्याने दरवषीप्रमाणे गर्दीचा उच्चांक मोडणारी मिरवणूक यंदा अनुभवता आली नसली तरी कोरोना साथीमुळे का होईना हा गणेशोत्सव सामाजिक भान जपणारा ठरला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या आवाजाबाबत दरवषी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी नोंद करीत असतात. 2001 पासून महाविद्यालयाकडून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार 2001 मध्ये विसर्जन मिरवणुकीचा सरासरी आवाज 90 डेसिबल होता, जो आपल्या कानांसाठी धोकादायक आहे. 2007 ते 2013 दरम्यान हा आवाज शंभरच्या वर पोचलेला होता. यंदा मात्र लाऊड स्पीकर नाही, मिरवणूकच नाही, त्यामुळे ढोल ताशे, डीजेही नाही. परिणामी अजिबातच ध्वनीप्रदूषण झाले नाही. वाईटातून चांगले कधी कधी होते, त्याप्रमाणे हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्टय़ ठरणारे आहे.
या निमित्ताने अनंत व्रताची थोडक्मयात माहिती देणे उद्बोधक आहे. विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणाऱया या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. अनंत म्हणजे जो कधी संपणार नाही तो. मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे, अपेक्षित यश मिळावे या उद्दशाने केले जाते. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या इतर देवता आहेत. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या लाल रेशमाच्या दोऱयाची पूजा केली जाते. पूजेनंतर दोरा पुरुषांच्या उजव्या हातात बांधतात, ज्याला अनंत म्हणतात. स्त्रियांच्या डाव्या हातात असाच छोटा दोरा बांधतात, ज्याला अनंती असे म्हणतात. अनंत व्रतात 14 गाठींचे रेशमी दोरे वापरले जातात. त्याला आपल्या शरीरातील ग्रंथींचा संदर्भ आहे.
‘मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱयाला 14 गाठी असतात. प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते. दोऱयांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱया ग्रंथीपर्यंत वाहणाऱया क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. 14 गाठींच्या दोऱयाची मंत्रांच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची दोऱयात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारित होतो. यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास साहाय्य मिळते. हरियाणातही या दिवशी अनंताचे व्रत घेण्याची प्रथा आहे.
विलास पंढरी – 9860613872








