चकमकीत सात दहशतवाद्यांचाही खात्मा
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानातील अशांत बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांशी झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत किमान 12 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तसेच अन्य पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने एका निवेदनात यासंबंधी अधिकृत माहिती दिली. बलुचिस्तान प्रांतातील सुई आणि झोब भागात बुधवारी हल्ले होऊन मोठी जीवितहानी झाली. दोन्ही चकमकीत किमान सात दहशतवादीही मारले गेले. अशांत प्रदेशात एका दिवसात झालेली ही सर्वाधिक जीवितहानी असल्याचे लष्कराने म्हटले आहे. झोब गॅरिसनमधील लष्कराच्या तळावर हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत नऊ सैनिक आणि पाच दहशतवादी ठार झाले. झोब चौकीवर झालेल्या हल्ल्यानंतर सुई येथे जोरदार संघर्ष झाला. छावणीमध्ये घुसण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जवानांनी गोळीबार केल्यानंतर संघर्षाची ठिणगी उडाली. सुई येथे कारवाई करत असलेल्या सुरक्षा दलांवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. या चकमकीत किमान तीन सैनिक ठार आणि पाच जखमी झाले. गोळीबारात दोन दहशतवादीही ठार झाले. या हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.









