देशभरात 1 सप्टेंबर 2021 पासून नवे नियम – पाच नियमांमध्ये बदलाचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात 1 सप्टेंबर 2021 पासून काही सुविधांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये ग्राहकांचे सेव्हिंग खाते पंजाब नॅशनल बँकेत असेल तर, पुढील महिन्यापासून ग्राहकांना जमा रक्कमेवर कमीत कमी व्याज मिळणार आहे. यासह ईपीएफओशी संबंधीत नियमावलीसह बँकेसंदर्भातील नियम बदलत आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.
पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात बदल
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांच्याकडून सेव्हिंग खात्यावर (बचत खाते) मिळणाऱया व्याजात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पीएनबी बचत खात्यावरील जमा रक्कमेवर 1 सप्टेंबरपासून 2.90 टक्के व्याज देणार असल्याची माहिती आहे. सध्या बँक यावर 3 टक्के व्याज देत आहे.
ईपीएफ खात्याची आधारसोबत जोडणी
ईपीएफओने ईपीएफ खात्याला आधारसोबत लिंक करणे अनिवार्य केले आहे. 1 सप्टेंबरच्या अगोदर ईपीएफ खाते आणि आधार नंबर लिंक केले नसल्यास कंपनीकडून खात्यावर जमा होणारे कॉन्ट्रिब्यूशन थांबविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ईपीएफ खात्यामधील पैसे काढतानाही समस्या येणार असल्याची माहिती आहे.
ऍक्सिस बँकेत पॉझिटीव्ह पे सिस्टम
ऍक्सिस बँकेत 1 सप्टेंबरपासून ‘पॉझिटीव्ह पे सिस्टम’ लागू करण्यात येणार आहे. या नियमानुसार ग्राहकांना 50 हजार रुपयांपेक्षा अधिकचा चेक सादर करताना संबंधीत चेकबाबतचा तपशील देणे आवश्यक राहणार आहे.
डिज्नी + हॉटस्टारचा प्लॅन महागणार
ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन महाग होणार आहे. युजर्सना बेस प्लॅनसाठी 399 रुपयाच्या ठिकाणी 499 रुपये देणे आवश्यक ठरणार आहे.
गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल शक्य
1 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. प्रती महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती निश्चित करत असतात.









