शारजाह:
संदीप शर्मा (2-20), होल्डर (2-27) यांच्यासह अन्य गोलंदाजांच्या भेदक माऱयामुळे सनरायजर्स हैदराबाद संघाने आयपीएल साखळी सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबी संघाला 5 गडी राखून सहज नमवले.
प्रारंभी, आरसीबीला 20 षटकात 7 बाद 120 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखण्याचा पराक्रम साधल्यानंतर हैदराबादने 14.1 षटकात 5 बाद 121 धावांसह सहज विजय संपादन केला. या विजयासह हैदराबादचे प्ले-ऑफमधील पोहोचण्याचे लक्ष्य कायम राहिले आहे.
संदीप शर्माने आयपीएलमध्ये विराट कोहलीसारख्या कसलेल्या, अव्वल फलंदाजाला सातवेळा बाद करण्याचा विक्रम केला, हे या लढतीचे आणखी एक वैशिष्टय़ ठरले. आरसीबीतर्फे सलामीवीर जोश फिलीपने सर्वाधिक 32 धावा केल्या.
आरसीबीचे आघाडी फळीतील तीन फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाले आणि यानंतर आरसीबीला या पडझडीतून सावरणे शक्य झाले नाही.
सलामीवीर देवदत्त पडिक्कल 5 धावांवर तर कर्णधार विराट कोहली केवळ 7 धावांवर बाद झाल्यानंतर 4.4 षटकातच आरसीबीची 2 बाद 28 अशी पडझड झाली. एबी डीव्हिलियर्सला या लढतीत बरेच झगडावे लागले आणि चेंडूमागे 1 धाव या समीकरणाने 24 चेंडूत 24 धावांवर तो बाद झाला. जोश फिलीपने 31 चेंडूत 32 धावा केल्या. पण, त्यालाही याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यापूर्वीच तंबूत परतावे लागले.
प्रारंभी, देवदत्तचा संदीप शर्माने त्रिफळा उडवला तर त्यानेच विराटला आऊटस्विंगरवर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरील विल्यम्सनकरवी झेलबादही केले.
नदीमने एबी डीव्हिलियर्सची खेळी डीप पॉईंटवर तैनात अभिषेक शर्माकरवी संपुष्टात आणली. भेदक मारा साकारणाऱया रशीदने फिलीपला डीप मिडविकेटवरील पांडेकरवी झेलबाद केले. टी. नटराजनने परतीचा झेल घेत वॉशिंग्टन सुंदरला तंबूचा रस्ता
दाखवला.
धावफलक : आरसीबी : फिलीप झे. पांडे, गो. रशीद खान 32 (31 चेंडूत 4 चौकार), पडिक्कल त्रि. गो. संदीप शर्मा 5 (8 चेंडूत 1 चौकार), विराट झे. विल्यम्सन, गो. संदीप शर्मा 7 (7 चेंडू), डीव्हिलियर्स झे. अभिषेक शर्मा, गो. नदीम 24 (24 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), वॉशिंग्टन झे. व गो. नटराजन 21 (18 चेंडूत 2 चौकार), गुरकिरत नाबाद 15 (24 चेंडूत 1 चौकार), मॉरिस झे. वॉर्नर, गो. होल्डर 3 (4 चेंडू), उदाना झे. विल्यम्सन, गो. होल्डर 0 (1 चेंडू), सिराज नाबाद 2 (3 चेंडू). अवांतर 11. 20 षटकात 7-120.
गोलंदाजी : संदीप शर्मा 4-0-20-2, होल्डर 4-0-27-2, नटराजन 4-0-11-1, नदीम 4-0-35-1, रशीद 4-0-24-1.
हैदराबाद : वॉर्नर झे. उदाना, गो. वॉशिंग्टन 8 (5 चेंडू), साहा यष्टीचीत डीव्हिलियर्स, गो. चहल 39 (32 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), पांडे झे. मॉरिस, गो. चहल 26 (19 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), विल्यम्सन झे. कोहली, गो. उदाना 8 (14 चेंडू), अभिषेक झे. गुरकिरत, गो. सैनी 8 (5 चेंडूत 1 षटकार), होल्डर नाबाद 26 (10 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), समद नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 6. 14.1 षटकात 5 बाद 121. गोलंदाजी : मॉरिस 2-0-19-0, वॉशिंग्टन 3-0-21-1, सैनी 2-0-30-1, सिराज 1-0-12-0, चहल 3.1-0-19-2, उदाना 3-0-20-1.









