दुबई
आधीचा सामना जिंकून प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवणाऱया राजस्थान रॉयल्सला रविवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामनाही जिंकणे आवश्यक आहे. आयपीएल साखळी फेरीतील त्यांचा हा शेवटचा सामना असून सायंकाळी 7.30 पासून त्याची सुरुवात होईल.
पहिली आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकावाच लागणार आहे. पण त्याचबरोबर अन्य सामन्यांचे निकालही त्यांच्यासाठी अनुकूल ठरतील, अशी अपेक्षा करावी लागणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने शेवटचा सामना गमविला आणि सनरायजर्स हैदराबादने आपले शेवटचे दोन्ही सामने गमविले तर ते राजस्थानला फायद्याचे ठरणार आहे. असे झाल्यास रनरेट विचारात न घेता राजस्थानला 14 गुणांसह आगेकूच करण्याची संधी मिळेल. मात्र सध्या त्यांना रविवारचा सामना जिंकण्यावर लक्ष केंदित करावे लागणार असून अन्य अपेक्षित निकालांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अत्यंत कठीण स्थिती असल्याने सरस रनरेट राखण्यासाठी राजस्थानला मोठय़ा फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. यासाठी त्यांना फलंदाजांच्या कामगिरीवर भिस्त ठेवावी लागेल.
शुक्रवारच्या सामन्यात बेन स्टोक्सने सामनावीराचा पुरस्कार मिळविताना झंझावाती अर्धशतक नोंदवले आणि 2 बळीही टिपल्याने किंग्स इलेव्हन पंजाबवर राजस्थानला विजय मिळविता आला होता. स्टोक्सला महत्त्वाच्या टप्प्यावरच फॉर्म गवसला असून ही त्यांच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बाब आहे.
केकेआरसाठी मात्र ही बॅड न्यूज आहे. कारण स्टोक्स एकहाती सामन्याच्या निकालावर परिणाम करू शकतो, याची त्यांना जाणीव आहे. संजू सॅमसनला पुन्हा मिळालेला सूर हीदेखील राजस्थानसाठी आनंददायक बाब आहे. त्याने स्फोटक फलंदाजीने या स्पर्धेची सुरुवात केली. पण नंतर त्याचा फॉर्म हरविला आणि राजस्थानच्या अडचणीत भर पडली होती. पंजाबविरुद्ध त्याने शानदार खेळी करीत संघाला यश मिळवून दिले. कर्णधार स्मिथ परिस्थितीनुसार खेळ करतोय तर उथप्पाकडे आक्रमक खेळण्याची क्षमता आहे. जोस बटलर, राहुल तेवातिया आणि युवा रियान पराग हे खालच्या क्रमांकावर आक्रमक खेळणारे फलंदाज आहेत. गोलंदाजीत आर्चरने सर्वाधिक चमक दाखविली असून त्याच्यावरच राजस्थानच्या गोलंदाजीचा मुख्य भार असेल.
राजस्थान व पंजाबइतकेच केकेआरचेही गुण आहेत. पण प्लेऑफचा त्यांचा मार्ग खूप खडतर बनला आहे आणि याला त्यांचा खराब रनरेटही जबाबदार आहे. त्यांना फक्त एकच आशा करावी लागणार आहे. राजस्थानला हरवून 14 गुण मिळविणे आणि त्यांच्याबरोबर शर्यतीत असलेल्या इतर कोणत्याही संघाने 14 गुण मिळविले नाही तरच ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. पण ही गोष्ट घडण्याची शक्यता फारच कमी आहे. गेल्या दोन सामन्यातील पराभवांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. असे असले तरी शुभमन गिल, नितिश राणा, कर्णधार मॉर्गन फलंदाजीत आणि वरुण चक्रवर्ती, कमिन्स, नागरकोटी गोलंदाजीत सर्वस्व देण्याचाच प्रयत्न करतील, यात शंका नाही.









