कोरोनाप्रकरणी आरोग्यतज्ञांचा इशारा : दिल्लीत युरोपसारखी स्थिती होऊ देऊ नका
राजधानी दिल्लीत सातत्याने वाढत असणारे कोरोनाबाधित चिंतेचे कारण ठरले आहेत. अशा स्थितीत दिल्लीत संक्रमण रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक दिशानिर्देश दिले आहेत. तर हिवाळय़ात कोरोनाबाधितांची ओळख पटविणे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. कोरोना संक्रमणामुळे अन्य विषाणूप्रमाणेच थंडी तसेच ताप येऊ शकतो, सर्दी-खोकला होऊ शकतो, कोरोनाचा संसर्ग तीव्र झाल्यास तीव्र थकवा, गंध आणि चवक्षमता गमावली जाऊ शकते. अनेकदा लोकांमध्ये प्रारंभीच श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो, परंतु लोक दुर्लक्ष करत असल्याने संसर्ग गंभीर होतो. विषाणू शरीरात पोहोचल्यावर विविध स्वरुपात प्रभाव पाडतो, असे तज्ञांनी म्हटले आहे.
युरोपसारखी स्थिती शक्य
देशात एकवेळी 90 हजार रुग्ण प्रतिदिन सापडत होते, परंतु आता हा आकडा 30 हजारांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. सुमारे 95 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सद्यकाळात जगात भारताची स्थिती खूपच चांगली आहे, परंतु देशात दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात युरोपसारखी स्थिती होऊ शकते. तेथे वारंवार अचानकपणे रुग्ण वाढत आहेत. दिल्लीला कंटेन्मेंट झोनमधून बाहेर काढण्यासाठी राज्यासह केंद्र सरकारही तयारी करत आहे. चाचण्यांचे प्रमाण दिल्लीत दुप्पट करण्यात आले आहे.
सौम्य लक्षणे

दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांमध्ये गर्दीयुक्त अनेक भाग आहेत. लोकांचे प्रवास करण्याचे प्रमाणही अधिक आहे. याचबरोबर सण आणि विवाहाचा हंगाम सुरू आहे. लोक घराबाहेर पडत असून अनेक दिवसांनी भेटत असल्याने पार्टीही करू लागले आहेत. याचमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. याचबरोबर चाचण्या हेदेखील कारण आहे. पूर्वी रुग्ण सापडल्यावर त्याच्या संपर्कात आलेल्या एक किंवा दोन जणांची चाचणी केली जात होती, परंतु आता 10 हून अधिक लोक चाचणी करवून घेत आहेत. चाचण्यांची सुविधाही वाढविण्यात आली आहे. यामुळे अधिक संख्येत रुग्ण सापडत आहेत. आरटी-पीसीआर चाचण्या वाढल्याने सौम्य लक्षणे असणारे रुग्णही लवकर आढळत आहेत.
निमलष्करी दल सरसावले
दिल्लीत कोरोना संक्रमण रोखण्यासाठी निमलष्करी दलाचे 75 डॉक्टर्स आणि 250 पॅरामेडिकल कर्मचाऱयांनी धाव घेतली आहे. हे सर्वजण सीएपीएफ, आरएएफ आणि अन्य निमलष्करी दलातील सदस्य आहेत. त्यांना गृह मंत्री अमित शाह यांनी विशेष स्वरुपात दिल्लीत कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी पाचारण केले आहे. हे डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचारी आसाम, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तराखंडमधील आहेत.









