अमेरिकेचे विदेशव्यवहार मंत्री माईक पाँपिओ यांचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताविरोधात कोणतीही कुरापत काढू नका, अशी तंबी अमेरिकेचे विदेशव्यवहार मंत्री माईक पाँपिओ यांनी चीनला दिली आहे. चीन आपल्या शेजारी देशांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आणत आहे. हिमालयातील त्याच्या कारवाया सहन केल्या जाणार नाहीत. चीनने आपल्या विस्तारवादी महत्वाकांक्षांना त्वरित आवर घालावा, असे त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सुनावले.
भारत हा अमेरिकेचा निकटचा सहकारी असून भारताशी सामरिक आणि धोरणात्मक संबंध वाढविण्यावर अमेरिका भर देत आहे. दोन्ही देशांमध्ये निकटचे आर्थिक आणि संरक्षण विषयक सहकार्य आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती दोन्ही देश मिळून एकत्रितरित्या करू शकतात, असे तज्ञांचे मत आहे. पाँपिओ यांचे ताजे वक्तव्य याला अनुकूल असल्याचे मानण्यात येत आहे.
जयशंकर यांच्याशी चर्चा
भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी पाँपिओ आणि अमेरिकेच्या इतर अधिकाऱयांशी द्विपक्षीय संबंधांवर बुधवारी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. भारताशी सहकार्याने मानवरहित विमाननिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याविषयीचा मुद्दाही चर्चेत आला, असे सांगण्यात येते. अलिकडच्या काळात अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी भारतात मोठय़ा गुंतवणुकीच्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे संबध अधिक जवळचे होत आहेत, असे तज्ञांचे मत आहे.









