वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या सीरोलॉजिकल सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले आहेत. नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (एनसीडीसी) आणि दिल्ली सरकारच्या या सर्वेक्षणात 22.86 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज (प्रतिपिंड) आढळल्या आहेत. 27 जून ते 10 जुलैदरम्यान पार पडलेले सर्वेक्षण हे संक्रमितांमध्ये मोठी संख्या लक्षणेरहितांची असल्याचे दर्शविते. हे निष्कर्ष पूर्ण देशासाठी दिलासादायक आहेत. दिल्लीत मागील महिन्यापर्यंत अत्यंत वेगाने रुग्णसंख्या वाढत होती. लोकांमध्ये समूह रोगप्रतिकारकशक्ती विकसित झाली आहे. समूह रोगप्रतिकारकशक्ती विकसित झाल्याने आगामी काळात नव्या रुग्णांचे प्रमाण कमी होत जाणार असल्याचे दिल्लीच्या कोविड नियंत्रण समितीचे सदस्य डॉ. डी.के. सरीन यांनी म्हटले आहे.
सुमारे एक-चतुर्थांश लोकांना कुठल्याही त्रासाशिवाय कोरोनाविरोधात प्रतिकारकशक्ती प्राप्त झाली आहे. या लोकांना कुठल्याही लसीची आता गरज नाही. म्हणजेच हे लोक आता कोरोनाच्या धास्तीशिवाय जगू शकतात. जून महिन्यात मोठय़ा प्रमाणावर कोरोना संसर्ग फैलावलेल्या दिल्लीसारख्या भागात एक-चतुर्थांश लोकसंख्येला रोगप्रतिकारकशक्ती प्राप्त होणे मोठी बाब आहे. अशाचप्रकारचा कल उर्वरित देशात राहिल्यास सुमारे 34-38 कोटी लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती विकसित झालेली असेल. ही आकडेवारी पूर्ण देशासाठी एक चांगला संकेत आहे. सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होणार असल्याचे डॉ. सरीन म्हणाले. आयसीएमआरने अशाचप्रकारचे देशव्यापी सर्वेक्षण केले आहे. तर दिल्लीत स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दिल्लीत दर महिन्याला सीरो चाचणी
दिल्ली सरकारने दर महिन्याला सीरो सर्व्हिलान्स करविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान निवडक भागांमध्ये लोकांची प्रतिदव्य चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीमुळे दिल्लीतील कोरोनाचा संसर्ग समजून घेण्यास मदत होणार आहे.
अद्याप 77 टक्के लोकसंख्येला धोका
दिल्लीच्या 77 टक्के लोकांना अद्याप संसर्गाचा धोका आहे. कंटेन्मेंटच्या उपाययोजना सुरूच ठेवल्या पाहिजेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हँड हायजीन आणि खोकताना नियमांचे पालन होणे गरजेचे असल्याचे एनसीडीसी संचालक डॉ. सुजीत कुमार सिंग यांनी म्हटले आहे.
चांगली बातमी
महामारीला सुमारे 6 महिने उलटून देखील केवळ 22.86 लोक प्रभावित झाले आहेत. यामागे संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेली टाळेबंदी आणि अन्य प्रतिबंधक उपाययोजना कारणीभूत मानल्या जाऊ शकतात, असे सिंग यांनी सांगितले आहे. नीति आयोगाचे सदस्य आणि कोविड-19 रिस्पॉन्स टीमचे प्रमुख डॉ. विनोद पॉल यांच्यानुसार आयसीएमआरने यापूर्वी केलेल्या सीरो सर्वेक्षणात दिल्लीत 9-11 टक्के लोकांना संसर्ग होऊ गेल्याचे आढळून आले होते.
कोरोनाने टोक गाठले
दिल्लीत कोरोना संसर्ग टोक गाठून गेल्याचा दावा डॉ. पॉल यांनी केला आहे. संसर्गावर देखरेख ठेवण्याची गरज आहे. विषाणू अँटीबॉडी नसलेल्या लोकांना लक्ष्य करत असल्याने काळजी घेतली जावी, असे पॉल यांनी म्हटले आहे.
सीरो सर्वेक्षणाची गरज
कोविड रुग्णांच्या उपचारात आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजेन चाचणी उपयुक्त आहे. अँटीबॉडी चाचणी कुठल्याही लोकसंख्येत संसर्गाचा फैलाव तपासण्यासाठी केली जाते. सर्व्हिलान्स नेटवर्कमधून लक्षणेरहित रुग्णांसह काही जण बाहेर राहत असल्याने लोकसंख्येत विषाणू किती फैलावला आहे हे समजत नाही. सीरो सर्वेक्षणामुळे लोकसंख्येतील संसर्गाचा अंदाज प्राप्त होतो.
जुलैत आलेख घटता
वाढलेल्या चाचण्यांमुळे रुग्णांची ओळख पटविण्यास मदत मिळाली, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि रुग्णांच्या आयसोलेशनमुळे संसर्गात घट झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात दिल्लीत प्रतिदिन 9,500 चाचण्या होत होत्या आणि पॉझिटिव्हिटी रेट 37 टक्के होता. तर जुलैच्या पहिल्या आठवडय़ात प्रतिदिन 25 हजारांपेक्षा अधिक चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हिटी रेट कमी होत 9 टक्क्यांवर आला आहे. आरोग्य तज्ञांनुसार दिल्लीत बाधितांची संख्या आता कमी होत जाणार आहे.









