कोरोनाविरोधी लढाईत चॅम्पियन ठरले राज्य – पंतप्रधानांकडून कौतुक
वृत्तसंस्था / शिमला
कोरोना लसीकरणात अव्वल राहिलेल्या हिमाचल प्रदेशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. मोदींनी सोमवारी हिमाचल प्रदेशातील आरोग्य कर्मचारी आणि कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आहे. यात राज्यपाल, मुख्यमंत्री, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, आमदार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
100 वर्षांमधील सर्वात मोठय़ा महामारीच्या विरोधातील लढाईत हिमाचल प्रदेश चॅम्पियन म्हणून उदयास आला आहे. स्वतःच्या पूर्ण लोकसंख्येला (निश्चित वयोगट) कोरोना लसीचा किमान एक डोस देणारे हिमाचल देशातील पहिले राज्य ठरल्याचे मोदी म्हणाले.
राज्यातील जनतेने कुठल्याही अफवेला, दुष्प्रचाराला थारा दिला नाही. देशाचा ग्रामीण समाज कशाप्रकारे जगातील सर्वात मोठय़ा आणि सर्वात वेगवान लसीकरण मोहिमेला मजबूत करत आहे याचा पुरावा हिमाचल प्रदेशात मिळतो. लाहौर स्पीति सारखा दुर्गम जिल्हादेखील 100 टक्के पहिला डोस देणारा ठरल्याने आनंद वाटत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत
संपर्कव्यवस्थेचा होतोय लाभ
सशक्त होणाऱया संपर्कव्यवस्थेचा थेट लाभ पर्यटनालाही मिळत आहे. फळ-भाज्यांचे पीक घेणाऱया शेतकऱयाला याचा लाभ होतोय. गावा-गावात इंटरनेट पोहोचल्याने हिमाचलमधील युवा कौशल्य, तेथील संस्कृती देशविदेशात पोहोचत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
सेंद्रीय शेतीचे आवाहन
केंद्र सरकार आता भगिनींच्या एनजीओंसाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करणार आहे. या माध्यमातून आमच्या भगिनी देश तसेच जगात स्वतःची उत्पादने विकू शकतील. सफरचंद, संत्री, मशरुम, टॉमेटो अस्शा अनेक उत्पादनांना देशाच्या कानाकोपऱयात पोहोचविता येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात हिमाचलमधील शेतकरी आणि बागायतदारांना एक आवाहन करू इच्छितो. आगामी 25 वर्षांमध्ये राज्याच्या शेतीला पुन्हा सेंद्रीय स्वरुप देण्यासाठी प्रयत्न करावेत. रसायनांपासून आमच्या मातीला मुक्त करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.
लसीकरणाचा विक्रम
भारत आता एका दिवसात 1.25 कोटी लसींचे डोस देत विक्रम करत आहे. एका दिवसात देशात जितक्या लोकांना लस मिळत आहे, तितकी तर अनेक देशांची लोकसंख्या देखील नाही. भारताच्या लसीकरण मोहिमेचे यश प्रत्येक देशवासीयाच्या मेहनतीचा परिणाम आहे. डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱयांनी लसीकरण कार्यक्रम पुढे नेण्यासाठी सांघिक स्वरुपात मिळून काम केल्याचे मोदींनी म्हटले आहे.









