कोरोना संसर्गातील बदलते स्ट्रेन, त्याचे उपप्रकार, इतर आजारांवर होणारे परिणाम प्रत्येक लाटेत दिसून आले आहेत. कोरोना संसर्ग आटोपता घेत असल्याचे दिसून येत असतानाच नुकत्याच झालेल्या राज्य कृती समितीतील सदस्यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार कोरोनायन मागच्या पानावरुन पुढच्या पानावर जाताना दिसते. वारंवार सूचना देऊनही त्यातून बोध घेणारे कमीच दिसत आहेत. .
येणाऱया 16 सप्टेंबर रोजी राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण उपक्रम सुरु होऊन 9 महिने पूर्ण होतील. लसीकरणात राज्य अव्वल आहे, तर मुंबई कोटय़ाधीश झाली आहे. मात्र हि लसीच्या पहिल्या डोस बाबतची आकडेवारी आहे. असे असले तरी देखील कोरोना नियंत्रणाच्या कारणात लसीकरण प्रमुख आहे. त्याचे कारण म्हणजे पहिल्या आणि दुसऱया लाटेतील बाधित रुग्ण, सक्रिय रुग्ण आणि मृत्यू यातील कमी होत जाणारी आकडेवारी पाहिल्यास हे कारण पटते देखील. रविवारी माझा डॉक्टर वैद्यकीय परिषद झाली. यात कोरोना कृती समितीतील तज्ञांनी दीड वर्षापासून दिलेली कोरोना आकडेवारी कोरोना संसर्गातील सतत होणारा बदल सांगते. राज्यात 9 मार्च 2020 रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्या पाठोपाठ संसर्गाची पहिली लाट सुरु झाली. लाटेतून रुग्णसंख्येचा उद्रेक सुरु झाला. 19 सप्टेंबर 2020 रोजी 24 हजार 886 हि दैनंदिन रुग्ण नोंद पहिल्या लाटेतील सर्वात मोठी नोंद होती. त्यावेळी याहून मोठय़ा संख्येत नोंद होईल असे वाटलेदेखील नव्हते. फेब्रुवारी 2021 मध्ये सुरु झालेल्या दुसऱया लाटेत 18 एप्रिल 2021 रोजी राज्यात 68 हजार 631 हि रुग्णसंख्येने नोंदीचे शिखर गाठले होते. अशी नोंद झाल्याने संसर्ग नियंत्रणाबाहेर जातो कि काय अशी शंका निर्माण झाली. मात्र त्यानंतर रुग्णनोंदीत घट होत जाऊन आता परवाच्या 4 सप्टेंबर रोजी 4 हजार 130 रुग्णनोंदीने कोरोना नियंत्रणात येत असल्याचे जाणवू लागले. असे असले तरी देखील लसीकरण आणि प्रामुख्याने मास्क लावणे सोडू नये असे सर्वच तज्ञांनी त्या परिषदेत सल्ला दिला. हि घट असली तरी देखील गेले 15 दिवस राज्यातील रुग्णसंख्या चार ते साडे चार हजारावर दिसून येत आहे. म्हणजे रुग्ण संख्या स्थिरावली असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळेच कोरोना अजून गेला नसून कोरोना वर्तणूक पाळण्यावर भर दिला जात आहे. 1 ऑगस्ट रोजी 6 हजार 400 तर 15 ऑगस्टनंतर 4 हजार 300 असे साडे चार हजाराच्या सरसरीत रुग्ण नोंद सतत होत आहे. 21 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या लाटेतील मृत्युदराची टक्केवारी देखील कमी होत आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रोजचे सरासरी रूग्ण 4 हजार 690 एवढे सापडत होते. तर एप्रिल महिन्यात रोजचे सरासरी 59 हजार 647 इतके आढळू लागले. एप्रिल महिन्यात संसर्ग वाढत असल्याचे या पूर्वी देखील आढळून आले. जून महिन्यात रोजची दैनंदिन सरासरी नोंद कमी होऊन 10 हजारावर आली. पुढे जुलै, ऑगस्ट आणि आताच सप्टेंबर महिन्यात ती घटत गेल्याचे दिसत आहे. त्याच वेळी मृत्यू दरात देखील चढ उतार दिसून आला. रूग्ण संख्येप्रमाणे मे-जून महिन्यात मृत्यू दर सरासरी सर्वाधिक होती. दुसऱया लाटेतील फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दर 1.11 टक्के एवढा होता. तर एप्रिल महिन्यात वाढून 1.65 टक्के एवढा झाला होता. मे-जून महिन्यात 2.48 टक्के एवढा झाला होता. जुलै ऑगस्ट महिन्यात कमी होत जाऊन सध्या सप्टेंबर महिन्यात 0.66 टक्के एवढा झाला आहे. सरासरी मृत्यू दर कमी होण्यामागील कारण लसीकरण असून लसीने संसर्गातील तीव्रता कमी केली असल्याचे तज्ञांचे मत आहे. लसीकरणामुळे सक्रिय आणि गंभीर रुग्ण संख्या देखील घटत आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये एक तृतीयांश घट झाली असल्याचे दिसून येत आहे. आजच्या नोंदीत 16 टक्के गंभीर रुग्ण आढळून येत आहेत. 1 ऑगस्ट रोजीच्या नोंदीनुसार 78 हजार 962 सक्रिय रुग्ण होते. तर 4 सप्टेंबर रोजी सक्रिय रुग्ण संख्या 52 हजारावर आली. मात्र 26 ऑगस्टपासून सक्रिय रुग्ण संख्या 50 ते 52 हजारावर स्थिरावली असल्याचे नोंद सांगते. यात हि राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी पाच जिह्यांत 72 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर आणि मुंबई या जिह्यांचा यात समावेश असल्याने सण उत्सवामध्ये प्रवास करताना कोरोना टेस्ट करण्यास सुचवले जात आहे. यात पुणे जिह्यात 30 टक्के, ठाणे जिह्यात 13 टक्के, सातारा जिह्यात 11 टक्के, अहमदनगर जिह्यात 9 टक्के तर मुंबईत 7.75 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. मात्र राज्यातील 6 जिह्यांत संसर्ग कमी होत असल्याचे दिसून येत आहे. धुळे, नंदूरबार, वर्धा, वाशिम, भंडारा, आणि गोंदिया या जिह्यांत 10 रुग्णाहूनही कमी सक्रिय रुग्ण आढळत आहेत. राज्यातील एकंदरीत सक्रिय रुग्णांमध्ये 8 हजार 426 एवढे रुग्ण हे गंभीर असून ते ऑक्सिजनवर आहेत. तर 3 हजार 376 रुग्ण आयसीयुत उपचार घेत आहेत. माझा डॉक्टर वैद्यकीय परिषदेत सांगितल्या प्रमाणे राज्यात 26 हजार 287 रुग्ण लक्षणविरहीत किंवा सौम्य लक्षणांचे आहेत. कोरोनातील सद्य स्थिती अशी असताना डेल्टा आणि डेल्टा प्लस असे व्हेरियंट प्रभावी होत असून यातील लक्षणे बदलत असल्याचे निरीक्षण मांडण्यात येत आहे. कोरोना रुग्ण म्हणजे धाप लागणे, ताप येणे, खोकला येणे हि लक्षणे सांगण्यात येत होती. आता मात्र त्या सोबत अन्य लक्षणे देखील दिसून येत आहेत. विशेषतः डेल्टा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये नवीन लक्षणे दिसू लागत असल्याचे मुंबईतील निरीक्षणातून मांडण्यात आले. गॅस्ट्रोसम लक्षण, डोळे लाल होणे, हगवण लागणे यासह रुग्णाचे तोंड कोरडे पडणे, अशी लक्षणे आढळत आहेत. हि अधिकची आणि महत कष्टाने नोंदवलेली लक्षण गंभीर असल्याचे या परिषदेत सांगण्यात आले. यासोबत सततची डोकेदुखी, ऐकण्यास कमी येणे, जठरोग उद्भवणे, बुबुळातील दाह, पुरळ आणि त्वचेला जळजळ अशा तक्रारी देखील रुग्ण करत आहेत. हि नवीन लक्षणे नोंद करून अभ्यासली जाणार आहेत. वैद्यकीय तज्ञांनी संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला असून कोरोनात मास्क हेच शस्त्र असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना घरीही बरा करता येतो मात्र कोरोना बाधा होऊच नये यासाठी कोरोना प्रोटोकॉल पाळून लस घेणे, मास्क लावणे, पॉजिटीव्ह असल्यास घरीच आयसोलेट होणे यातून संसर्ग खंडित करता येईल.
राम खांदारे








