प्रतिनिधी / बेळगाव
दिल्ली, केरळसह संपूर्ण देशामध्ये हिंदूंच्या हत्या वाढल्या आहेत. त्या थांबविणे गरजेचे आहे. याचबरोबर हत्या करणाऱया दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, या हत्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले. दिल्ली येथे श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी निधी संकलन करणाऱया रिंकू शर्मा याची हत्या करण्यात आली. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे के. राहुल, कृष्णा उर्फ नंदू यांची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेने हत्या केली आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगाल, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमध्ये हिंदूंना लक्ष केले जात आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी बंगालमध्ये याबाबत 300 हिंदू कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट करून चिंता व्यक्त केली आहे. भुपाल प्रल्हाद बंदवार, युवराजसिंह चव्हाण, कर्नाटकातील शरद मडिवाला, रुदेश कुट्टप्पा, प्रवीण पुजारी आणि राजू यांची हत्या केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे विजय नंदगडकर, सदानंद मासेकर, परशराम चौगुले, कोमल मुदनूर, शुभांगी कंग्राळकर उपस्थित होते.









