पाकिस्तानात बॉम्बस्फोट – 3 जणांचा मृत्यू- 17 जखमी
वृत्तसंस्था / लाहोर
पाकिस्तानच्या लाहोर येथील जौहर भागात स्फोट झाला आहे. या स्फोटात 3 जणांचा मृत्यू तर 17 जण जखमी झाले आहेत. एहसान मुमताज रुग्णालयानजीक हा स्फोट झाला आहे. प्रारंभिक तपासात सिलेंडर स्फोट का बॉम्बस्फोट हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही याप्रकरणी तपास करत आहोत असे लाहोरच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. तर हा स्फोट मुंबईवरील हल्ल्यांचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईदच्या घरानजीक झाल्याचे समजते. हाफिज सध्या तुरुंगात आहे.
स्फोटातील सर्व जखमींना जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे परिसरातील घरांनाही नुकसान झाले आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी पोलीस महासंचालकांना या स्फोटाचा तपास करत लवकरात लवकर अहवाल सोपविण्याचा निर्देश दिला आहे. स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









