मुलीला लागली होती भूक, वडिलांच्या मोबाईलवरून केली ऑर्डर
जीवनात लहान मुले मोठा आनंद निर्माण करत असतात, पण याचबरोबर कधीकधी टेन्शनही देतात. सद्यकाळात बहुतांश पालक स्वतःच्या रडणाऱया मुलांना गप्प करणे आणि त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी स्मार्टफोनचा वापर मोठय़ा प्रमाणावर करतात. पण कधीकधी मुले स्मार्टफोनने असे काम करतात, की पालकांना स्वतःच्या डोक्यावरच हात मारून घ्यावा लागतो. चीनमध्ये एका पित्यासोबत काही असेच घडले आहे. तेथे 15 जून रोजी एका 4 वर्षीय मुलनी चुकून स्वतःच्या वडिलांच्या मोबाईलवरून एकाच खाद्यपदार्थाची 100 वेळा ऑर्डर दिली.
या चिमुकलीला भूक लागल्याने तिने वडिलांच्या मोबाईलवरून झा जियांग मियान किंवा सोयाबीन पेस्टसोबत नूडल्स ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला. या मुलीला नूडल्सचा एक बाउल मागवायचा होता, पण तिने चुकून ‘शून्या’चे बटन दोनवेळा दाबले आणि 100 बाऊल नूडल्सची ऑर्डर झाली.

डिलिव्हरी मॅन नूडल्सचे 100 बाऊल्स घेऊन मुलीच्या घरी पोहोचल्यावर तिच्या वडिलांना धक्काच बसला. प्रारंभी मोफत नूडल्सचे बक्षीस जिंकल्याचे त्यांना वाटले. पण मोबाईल तपासल्यावर त्यांचा हा गोड गैरसमज दूर झाला. कारण सुमारे 15 हजार रुपयांची ऑर्डर त्यांच्याच स्मार्टफोनद्वारे करण्यात आली होती. ऑर्डर मोठी असल्याने त्यांच्या लिव्हिंग रुममध्ये बाऊल्सचा ढिगच लागला.
या रंजक घटनेची चित्रफित सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली आहे. कुटुंबाने नूडल्सचे 8 बाउल्स स्वतःकडे ठेवून उर्वरित सफाई कर्मचारी आणि गरजूंमध्ये वाटले आहेत. या घटनेतून पालकांना स्वतःच्या मुलांना मोबाईल देताना काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट होते, अन्यथा हजारोंचा नव्हे तर लाखोंचाही फटका बसू शकतो.









