प्रतिनिधी/ बेळगाव
चोविस तास पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यासाठी पाणीपुरवठय़ाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. पण कारभार हस्तांतर केलेल्या दुसऱयाच दिवशी शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अधिकाऱयांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पाण्याअभावी शहरवासियांची गैरसोय झाली.
शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पाणीपुरवठा मंडळाकडे होती. 48 वॉर्डांमध्ये चोविस तास पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्याची जबाबदारी एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठय़ाचा कारभार दि. 1 जुलैपासून एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. कारभार हाती घेतलेल्या दुसऱयाच दिवशी शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शुक्रवारी विविध भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांना संपर्क साधून पाणी समस्येबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी मोबाईल उचलला नाही. पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने कोणाला संपर्क साधायचा, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार असल्यास पाणीपुरवठा मंडळाकडून पत्रक प्रसिद्ध करून नागरिकांना कळविण्यात येते. पण कोणतीच पूर्वसूचना न देता शुक्रवारी अचानक शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
पाणीपुरवठा नियोजनात बदल झाल्यास किंवा व्यत्यय निर्माण होणार असल्यास पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. पण पाणीपुरवठय़ाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आल्याने पाणीपुरवठा मंडळाने पत्रक प्रसिद्ध केले नाही. एल ऍण्ड टी कंपनीकडूनही कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. पाणीपुरवठा बंद असल्याने याबाबतची माहिती घेण्यासाठी एल ऍण्ड टी कंपनीचे देखभाल विभागाचे अधिकारी सुहास कामत यांना संपर्क साधला असता, त्यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही. तसेच पाणी पुरवठय़ाची जबाबदारी एल ऍण्ड टीकडे हस्तांतर केल्यानंतर पाणी समस्येबाबत तक्रार नोंदविण्यासाठी माहिती देणे आवश्यक आहे. पण कंपनीच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.









