वृत्तसंस्था/ सेंट जॉर्ज
कर्णधार केरॉन पोलार्डच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुरुवारी यजमान विंडीजने दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना सेंट जॉर्जमध्ये शनिवारी खेळविला जाणार आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 6 बाद 167 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 146 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 21 धावांनी गमवावा लागला. विंडीजचा कर्णधार पोलार्डला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
विंडीजच्या डावामध्ये सलामीच्या सिमॉन्सने 34 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारासह 47, कर्णधार पोलार्डने 25 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 51 फटकावल्या तर ऍलेनने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 19 आणि पुरनने 2 चौकारासह 16 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 11 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे लिन्डे आणि शम्सी आणि प्रत्येकी दोन तर रबाडा आणि नॉर्त्जे यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. सलामीच्या डि कॉकने 43 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह 60, मार्करमने 20 चेंडूत 2 चौकारासह 20, मिलरने 1 षटकारासह 9 चेंडूत 12, रबाडाने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 16 धावा जमवल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 4 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. विंडीजच्या ड्वेन ब्रॅव्होने 19 धावात 4, रसेलने 30 धावात 2 तसेच गेल, मॅकॉय आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज 20 षटकात 6 बाद 167 (पोलार्ड नाबाद 51, सिमॉन्स 47, पुरन 16, ऍलेन नाबाद 19, लिन्डे 2-16, शम्सी 2-13, नॉर्त्जे 1-32, रबाडा 1-36) दक्षिण आफ्रिका 20 षटकात 9 बाद 146 (डि कॉक 60, मार्करम 20, रबाडा नाबाद 16, मिलर 12, ड्वेन ब्रॅव्हो 4-19, रसेल 2-30, गेल 1-11, मॅकॉय 1-33, पोलार्ड 1-24).









