कोरोनावर प्रभावी ठरतील अशा अनेक लसी बाजारामध्ये आल्यानंतर त्याचे चांगले परिणाम जगभर दिसू लागले आहेत. स्पुटनिक व्ही या रशियाच्या बहुचर्चित आणि सर्वाधिक प्रभावी लसीचे दोन डोस टोचून घ्या आणि मधल्या 21 दिवसांमध्ये रशिया फिरून घ्या अशी एक अफलातून सहल भारतातून सुरू झाली आहे. जगाची दारे हळूहळू एका देशातून दुसऱया देशात प्रवास करणाऱयांसाठी खुली होऊ लागल्याचे हे सुचिन्ह आहे. रशियाने भारतीयांना लस घेण्यासाठी त्यांच्या देशात येण्याची परवानगी दिली आहे. अशी परवानगी देणारा तो एकमेव देश आहे. एक लाख तीस हजार रुपये खर्चामध्ये ही सहल होऊ शकते. केवळ त्यासाठी प्रवाशाचा आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असण्याची अट रशियाने घातली आहे. गेल्या वषीच्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे एकाच ठिकाणी जखडून बसलेल्या नागरिकांना ऐपत असेल तर एक भरारी घेण्याची संधी या निमित्ताने निर्माण झाली आहे. 15 मे रोजी 30 डॉक्टरांचा एक चमू रशियाला रवाना झाला. पाठोपाठ दुसरी सहलही आयोजित केली जात आहे. भारतात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आणि भारतीय कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱया लस वेळेत मिळणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर भारत सरकारने ही रशियन लस भारतात आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या पाठोपाठच निर्माण झालेल्या संधीतून आता रशियाला सहल पाठवणे शक्मय झाले आहे. या सहलीकडे एक व्यवसाय म्हणून केवळ बघून चालणार नाही. भारतासह जगातील प्रत्येक देशात टुरिझम हा परदेशी चलन मिळवून देणारा एक मोठा भाग बनत आहे. लोकांचा जगभर प्रवास सुरू झाल्याशिवाय जग पुन्हा पूर्ववत धावायला लागणार नाही, हे तर स्पष्टच आहे. पण त्यासाठी कोरोनाची भीती नष्ट झाली पाहिजे आणि पुन्हा हे संकट परतणार नाही याची खात्री असली पाहिजे. रशिया, इस्राईल आणि अमेरिका या देशांना अशी खात्री पटू लागली आहे. नुकताच एका देशाने पन्नास हजार लोकांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आपला देश कोरोनापासून मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त केला. गेल्या महिन्यापूर्वी इस्राईलमध्ये लोकांना मास्क न वापरता फिरण्याची मुभा देण्यात आली आहे. सोळा वर्षाखालील मुले वगळता 84 टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाल्याने इस्राईलने आपल्या देशातील नागरिकांना मोकळीक दिली आहे. त्यानंतर सुरु झालेल्या लढाईमुळे इस्राईलचे हे यश जगापासून लपून राहिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनीही लसीकरण शंभर टक्के पूर्ण केलेल्या नागरिकांना मास्क वापरण्यापासून मुभा देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना गर्दीच्या ठिकाणी जाताना मात्र प्रत्येकाला मास्क वापरावाच लागेल. मात्र पूर्वीसारखे सरसकट मास्क वापरण्याची सक्ती आता अमेरिकेत राहिलेली नाही असे जाहीर केले. अमेरिकन तरुण वर्गाला आवाहन करताना बायडन यांनी, तुम्हाला मास्कशिवाय मुक्तपणे फिरायचे असेल तर लसीकरण पूर्ण करून या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे. यापूर्वी जगभरात कोरोना विरोधात लढण्यासाठी मास्क, शारीरिक अंतर आणि हात स्वच्छ धुणे हीच त्रिसूत्री अमलात आणणे गरजेचे बनले होते. लसीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणी नंतर जगातील या देशांमध्ये नागरिकांना या बाबतीत काही सवलती मिळू लागलेल्या आहेत. ही एक आनंद वार्ता आहे ज्यामुळे लस घेणाऱया जगातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतः बाबतीतला विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. गेले चौदा महिने जगाला भीतीच्या सावटाखाली जगावे लागले आहे. कोरोनाच्या साथीने माणसाला माणसापासून तोडून दूर करण्याचे काम केले. संकटाच्या काळी जोडलेली माणसे उपयोगात येतात असे म्हणतात. मात्र कोरोनाच्या या संकट काळात रक्ताच्या नात्यांनाही दूर व्हावे लागले. आजारपणात आपुलकीने विचारपूस करणे आणि उपचार सुरू असताना तिथे उपस्थित राहून धीर देणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज असते. मात्र कोरोना रुग्णाला उपचारासाठी अक्षरशः स्वकियांपासून दूर केले गेले. एकाकी झुंज देताना अनेकांनी धीर सोडला आणि त्यांच्यावर प्राण गमावण्याची वेळ आली. प्रमाणाबाहेर वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडून लोकांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. जगातला कुठलाही प्रगत किंवा अप्रगत देश त्याला अपवाद राहिला नाही. अजूनही या संकटातून जगातल्या सगळय़ा देशांची सुटका झालेली आहे अशातला भाग नाही. मात्र तरीही लस आल्यानंतर जगभरातल्या प्रत्येक व्यक्तीला दिलासा मिळालेला आहे. या लसीची पहिली मात्रा घेतलेले किंवा दोन्ही मात्रा घेऊन लसीकरण पूर्ण झालेले लोक सध्या भारतातसुद्धा अत्यंत सकारात्मकतेने, उत्साहाने जगत आहेत. मात्र भारताची लोकसंख्या इतकी मोठी आहे की त्या लोकसंख्येला पुरेल इतकी लस निर्माण करणे मोठे आव्हानाच होऊन बसले आहे. लस उत्पादक कंपन्यांना पुरेसा निधी नसल्यामुळे त्यांना वेळेत लस निर्माण करता आली नाही. जगभरातील ज्या देशांनी पैसा पुरवला त्यांनाही वेळेत ती पुरवता आली नाही. मात्र स्पुटनिकसारखा पर्याय निर्माण झाल्याने ज्यांची ऐपत आहे ते रशियासारख्या देशात जाऊनसुद्धा उपचार घेऊ शकतील शिवाय सहल करूनही परत येतील. देशातील मुंबईसह अनेक महापालिका जागतिक टेंडर काढून कोटय़वधी लसी भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे यंत्रणेवर पडलेला ताण बऱयाच अंशी हलका होईल. उपलब्ध होणारी लस ही भारतीयांचा उत्साह वाढवेल हे निश्चित. ग्रामीण भारताला सरकारी लसीची वाट पाहण्यावाचून गत्यंतर नाही. मात्र त्यांच्या हक्कातील वाटेकरी कमी झाले, हेही नसे थोडके! स्पुटनिक ट्रिपमुळे ही संख्या अधिक कमी झाली तर ते फायद्याचेच आहे.
Previous Articleहिरो मोटोकॉर्प युवकांसाठीआणणार नवी इलेक्ट्रीक स्कुटर
Next Article कोरोनावर ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी’ थेरपी प्रभावी ठरणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








