जिल्हय़ात चुरशीने मतदान : एकसंबा नगरपंचायतीसाठी 87.81, बोरगावमध्ये 82 टक्के मतदान : 30 रोजीच्या निकालाकडे लक्ष
वार्ताहर /एकसंबा, बोरगाव
नुकतीच झालेली विधानपरिषदेची चुरशीची निवडणूक आणि 2023 ला होणाऱया विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरलेली शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची निवडणूक सोमवारी पार पडली. चिकोडी आणि निपाणी विधानसभा मतदारसंघातील सत्ताकेंद असलेल्या एकसंबा आणि बोरगाव नगरपंचायतीत शांततेत आणि चुरशीने मतदान झाले. याबरोबरच अथणी, उगार खुर्द, हारुगेरी, मुगळखोड नगरपरिषद आणि ऐनापूर, शेडबाळ, चिंचली, कंकणवाडीसह जिल्हय़ात मुदत संपलेल्या नगरपंचायतीतील उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. आता सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले असून 30 रोजी कोणाच्या गळय़ात विजयाची माळ पडणार?, याविषयी आतापासूनच तर्कवितर्क लढविले जात आहेत.
उत्साही वातावरणात, जिद्दीने, नि÷sने, कर्तबदारीने व लोकशाही बळकटीचे ध्येय बाळगून सोमवारी एकसंबावासियांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7 वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होती. सकाळच्या सत्रात धुके असतानाही मतदारांनी मतदान करण्यास पसंती दिली. एकूण 11,953 मतदारांपैकी 6013 पुरुष व 5940 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकसंबा नगरपंचायतीसाठी एकूण 87.81 टक्के मतदान झाले आहे. अपेक्षेप्रमाणे मतदान झाल्याने कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
17 प्रभागांसाठी सकाळी 7 ते 9 या वेळेत 737 पुरुष, 660 महिला अशा एकूण 1397 मतदारांनी हक्क बजावताना 10.34 टक्के मतदान झाले. 9 ते 11 या वेळेत 1996 पुरुष, 2209 महिला, एकूण 4205, 31.13 टक्के मतदान, 11 ते 1 या वेळेत 3199 पुरुष, 4090 महिला एकूण 7289, 53.97 टक्के मतदान, 1 ते 3 या वेळेत 4478 पुरुष, 5315 महिला, एकूण 9793, 72.51 टक्के मतदान झाले. 3 ते 5 या वेळेत शेवटच्या टप्प्यात 6013 पुरुष, 5940 महिला, एकूण 11,953 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 87.81 टक्के मतदान झाले आहे.
निवडणूक लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेची
लोकप्रतिनिधींच्या गावातील निवडणूक असल्याने हुक्केरी व जोल्ले यांची प्रति÷ा पणाला लागली आहे. ते गेल्या पाच दिवसापासून चाललेल्या प्रचारातून दिसून येत आहे. केवळ सभा किंवा रॅली न काढता वैयक्तिक व घरोघरी जाऊन नेत्यांनी प्रचार केल्याने या निवडणुकीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे विकासकामांचा आलेख तर दुसरीकडे आश्वासनांचा पाऊस या सगळय़ात नगरपंचायत निवडणूक रंगली आहे. सकाळी खासदार आण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले, ज्योतीप्रसाद जोल्ले व बसवप्रसाद जोल्ले यांनी प्रभाग 9 मध्ये मतदानाचा हक्क बजावला. तर सायंकाळी माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी प्रभाग 7 मध्ये मतदानाचा हक्क बजावला.
एकसंबा नगरपंचायतीसाठी सोमवारी चुरशीने 87.81 टक्के मतदान झाले. वाढलेल्या मतदानाचा लाभ कोणाला होणार हे 30 रोजीच्या निकालात स्पष्ट होणार आहे. पण सध्या सर्वच ठिकाणी कोण कोणत्या प्रभागात निवडून येणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गत निवडणुकीपेक्षा ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळी व उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. भाजपने सत्ता राखण्यासाठी तर काँग्रेसने सत्ता मिळविण्यासाठी आपली ताकद पणाला लावून काम केले आहे. याचे फळ कोणाला मिळणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
बोरगाव येथे 17 जागांसाठी मतदान
बोरगाव नगरपंचायतीसाठी एकूण 17 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात असून त्यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले. एकूण 12,873 मतदारांपैकी 10 हजार 563 जणांनी मतदान केले. त्यामध्ये 5877 पुरुष व 4686 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी थंडी असूनही पहिल्या टप्प्यात 53 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. दुपारी 1 नंतर दुपारी 4 वाजेपर्यंत काही मतदान केंद्रांवर नागरिकांची तुरळक गर्दी होती. बोरगावमध्ये एकूण 82 टक्के मतदान झाले. मतदान काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी यांच्यासह 50 पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याशिवाय एसआरपीचे वाहन तैनात करण्यात आले होते. येथील प्रभाग क्र. 1 मध्ये 1330 मतदार आहेत. येथील जुन्या कन्नड शाळेमध्ये या प्रभागातील मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्था जागा
- अथणी (अथणी)……….. 27
- एकसंबा (चिकोडी)…….. 17
- बोरगाव (निपाणी)…….. 17
- उगारखुर्द (कागवाड)…… 23
- ऐनापूर (कागवाड)…….. 19
- शेडबाळ (कागवाड)……. 16
- चिंचली (रायबाग)…….. 19
- हारुगेरी (रायबाग)……. 23
- मुगळखोड (रायबाग)….. 23
- कंकणवाडी (रायबाग)…. 17
- अरभावी (मुडलगी)……. 16
- कल्लोळी (मुडलगी)……. 16
- नागनुरी (मुडलगी)…….. 17
- मुन्नवळी (सौंदत्ती)……… 23
- कित्तूर ………………… 27
- एम के हुबळी …………. 14









