वृत्तसंस्था/मुंबई
एप्रिल महिन्यामध्ये पेट्रोल व डिझेलच्या मागणीमध्ये घट दिसली असून सौदी अरेबिया सरकारकडून जूनमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कपात करण्याचे संकेत वर्तविले जात आहेत.
केरोनाच्या दुसऱया लाटेमुळे भारतामध्ये एप्रिल महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या मागणीमध्ये घट झाली आहे. जूनमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती आशियाई देशांसाठी कमी करण्याचे संकेत सौदी अरेबियातील सरकारने व्यक्त केले आहेत. जूनमध्ये सौदी अरेबिया सरकार ऑफिशियल सेलिंग प्राइसमध्ये कपात करू शकते. जूनमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेने पुन्हा विविध राज्यात लॉकडाऊन लावला जात असून पुन्हा व्यवहार थंडावताना दिसत आहेत. नोकरदार वगळता इतर लोकांनी सध्या घरीच राहणे पसंत केले आहे. रस्त्यावरची वाहतूकही सध्याला तुरळक झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील वाहनांची घोडदौड मंदावली असून वैयक्तिक वाहनधारकांची संख्याही कमी झाली आहे. याचाच परिणाम पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर दिसून येत आहे. एप्रिलमध्ये इंधनाची मागणी घटली आहे. हाच ट्रेंड लॉकडाऊन सुरूच राहिल्यास मे महिन्यात दिसून येण्याची शक्यता सांगितली जात आहे.









