एकूण 2 लाख 86 कार्सची विक्री- फक्त महिंद्रा, होंडाची सकारात्मक कामगिरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये वाहन विक्रीत 10 टक्के इतकी घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या विक्रीत 47 टक्के वाटय़ासह मारूती सुझुकी आघाडीवर राहिली आहे.
ऑटोमोबाईल कंपन्यांनी एप्रिल 2021 मधील वाहन विक्रीची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत मागच्या वर्षाच्या तुलनेत सर्व कंपन्यांना एप्रिलमध्ये 100 टक्के फायदा झाला आहे. एप्रिल 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात एकही गाडी विक्री झाली नव्हती. पण मार्च 2021 च्या तुलनेत मात्र एप्रिलमध्ये वाहन विक्री कमी झाली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे वाहन विक्रीवर दबाव दिसला आहे.
एप्रिल 2021 मध्ये एकूण 2 लाख 86 हजार 450 कार्सची विक्री झाली आहे. तर मार्च 2021 मध्ये 3 लाख 20 हजार 547 कार्सची विक्री झाली होती. त्यामुळे महिन्याच्या तुलनेत विचार करता विक्री 10 टक्के इतकी घटली आहे. कार विक्रीत मात्र नेहमीप्रमाणे मारूती सुझुकीनेच बाजी मारल्याचे दिसले आहे.
मारूती सुझुकीची घट 7 टक्के
एप्रिल 2021 मध्ये देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारूती सुझुकीने 1 लाख 35 हजार 879 कार्सची विक्री केली आहे. महिन्याच्या आधारे पाहता 7 टक्के इतकी विक्री घटली आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने 1 लाख 46 हजार 203 वाहनांची विक्री केली होती.
हय़ुंडाई या कंपनीच्या कार विक्रीत महिन्याच्या आधारे घट झाली आहे. एप्रिल 2021 मध्ये कंपनीने 49 हजार 2 कार्सची विक्री केली आहे. महिन्याच्या आधारावर पाहता विक्रीत 6 टक्के घट झाली आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने 52 हजार 600 कार्सची विक्री केली होती. कंपनीचा बाजारातील वाटा 17 टक्के होता.
टाटाचीही विक्री घटली
ऑटोमोबाइल क्षेत्रातील आणखी एक कंपनी टाटा मोटर्सच्या कार विक्रीतही एप्रिलमध्ये घट झाली आहे. एप्रिल 2021 मध्ये कंपनीने 25 हजार 95 कार्सची विक्री केली. महिन्याच्या आधारे पाहता विक्री 15 टक्के कमी झाली. मार्च 2021 मध्ये कार विक्री 29 हजार 654 इतकी झाली होती. कंपनीने बाजारात 8 टक्के इतका वाटा राखला होता.
किया तोटय़ात
एप्रिल 2021 मध्ये किया मोटर्सने 16 हजार 111 कार्सची विक्री केली असून महिन्याच्या आधारे पाहता विक्री 15 टक्के घटली असल्याचे दिसून आले आहे. मार्च 2021 मध्ये 19 हजार 100 कार्सची विक्री झाली होती.
टोयोटाची विक्री 35 टक्के प्रभावीत
टोयोटाने एप्रिल 2021 मध्ये 9 हजार 621 कार्सची विक्री केली असून महिन्याच्या आधारे पाहता विक्रीत 35 टक्के इतकी घट झाली आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीला 15 हजार 1 कार्सची विक्री करता आली आहे.
याबरोबरच होंडाच्या कार्सची विक्री मात्र 27 टक्के वाढून 9 हजार 71 वर पोहचली असल्याचे समोर आले आहे. मार्च 2021 मध्ये 7 हजार 103 कार्सची विक्री झाली होती. रेनोने एप्रिलमध्ये 8 हजार 642 कार्सची विक्री केली होती, जी आधीच्या महिन्याच्या तुलनेत 30 टक्के घट दर्शवणारी ठरली.
महिंद्रा मात्र फायद्यात
एकीकडे इतर कंपन्यांच्या कार्सची विक्री एप्रिलमध्ये घटली असल्याचे समोर आलेले असले तरी या घोडदौडीत मात्र महिंद्राने कार विक्रीत वाढ दर्शवली आहे. मागच्या महिन्यापेक्षा 9 टक्के इतकी अधिक कार विक्री करण्यात कंपनीला यश आलं आहे. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये 18 हजार 285 कार्सची विक्री केली आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने 16 हजार 700 कार्सची विक्री केली होती.









