5 मिनिटांच्या अंतरावर शाळा, रेस्टॉरंट-दुकाने
एअर टॅक्सीची सेवा, कायदेही वेगळे असणार
सौदी अरेबियाने स्वतःची फ्यूचर सिटी ‘द लाइन’ला आकार देण्यास सुरुवात केली आहे. या इको सिटीचे निर्मितीकार्य वेगाने सुरू आहे. 2024 पर्यंत या शहरात लोक राहू लागतील असा दावा करण्यात येतोय. सुमारे 170 किलोमीटर लांबीच्या या अनोख्या भागाला युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी सेंट्रल स्पाइन संबोधिले होते.
निर्मिती तीन स्तरांमध्ये होणार आहे. पहिला स्तर पायी चालणाऱयांसाठी, उर्वरित दोन स्तर वाहतूक आणि पायाभूत संरचनेसाठी असणार आहे. मोठा प्रकल्प असल्याने विकासक दोन टोकांकडून याचे काम सुरू करत आहेत. या इको सिटीत 10 लाख लोक राहू शकतील. हे शहर अल्ट्रा हायस्पीड ट्रान्झिट आणि ऑटोनॉमस मोबिलिटी सोल्युशन्सशी संलग्न राहणार असल्याचे प्रकल्पाचे सीईओ नदमी अल नस्र यांनी सांगितले आहे.

5 मिनिटांवर सर्व सुविधा
शाळा, रेस्टॉरंट, दुकाने सर्व नागरी क्षेत्रांपासून केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर असतील. कुठलाही प्रवास 20 मिनिटांपेक्षा अधिकचा नसेल. 95 टक्के नैसर्गिक संपदा सुरक्षित राहिल अशाप्रकारे निर्मिती होणार आहे. या प्रकल्पावर 15 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे 3.8 लाख नोकऱया निर्माण होतील.
कार्बनमुक्त यंत्रणा
‘द लाइन’ प्रकल्प निओमचा हिस्सा असून याच्या अंतर्गत सौदी अरेबियाच्या जॉर्डन तसेच इजिप्तला लागून असलेल्या सीमेवर 37.5 लाख कोटी रुपये खर्चुन मेगासिटी निर्मिली जाणार आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा कार्बनमुक्त यंत्रणेचा असेल. यात 16 उपनगरे असतील आणि ती ऊर्जेसाठी पवन आणि सौरऊर्जेवर अवलंबून असतील. पाण्याला ऑक्सिजन आणि इंधनासाठी हायड्रोजनमध्ये बदलण्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर होईल.
अत्याधुनिक तंत्रज्ञान
प्रकल्पाचा उद्देश सौदीला सिलिकॉन व्हॅली सारख्या तंत्रज्ञान केंद्रात बदलणे आहे. असाधारण जीवन जगू इच्छिणाऱयांना येथे निवासस्थान प्राप्त होईल. तेथे व्यवसायाच्या प्रगतीसह पर्यावरण संरक्षणावर भर असेल. एआय पॉवर्ड फ्लाइंग ड्रोन टॅक्सी, रोबोटिक डायनोसोरसोबत ज्युरासिक पार्कसारखे एम्युजमेंट पार्कही असणार आहे. जगातील सर्वात मोठे कोरल गार्डन, क्लाउड सीडिंग आणि विशाल कृत्रिम चंद्र येथील दृश्य अद्भूत करणार आहेत. हा फ्री झोन असल्याने येथील कायदे सौदीच्या कायद्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतील.









