सेन्सेक्समध्ये 231 अंकांची वाढ, बँक, ऑटो समभागांचा आधार
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दबावात असणारा शेअर बाजार सरतेशेवटी काहीशा वधारासह बंद होण्यात यशस्वी झाला. दिवसभरच्या सत्रात बाजारात चढ-उतार दिसून आला. ऑटो व बँकेच्या समभागांनी बाजाराला आधार दिला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 231 अंकांच्या वाढीसह 57,593.49 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 69 अंकांच्या वधारासह 17,222 अंकांवर बंद झाला आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजार तेजीसह खुला झाला होता. पण त्यानंतर मात्र बाजारात चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्समधील एचडीएफसी, नेस्ले इंडिया आणि डॉ. रेड्डीज लॅब्ज यांचे समभाग घसरणीत होते तर रिलायन्स, मारुती, भारती एअरटेल, ऍक्सिस बँक यांचे समभाग तेजीत होते. सेन्सेक्स सकाळी 110 अंकांच्या तेजीसह 57,472 अंकांवर खुला झाला होता. एनएसईचा निफ्टी निर्देशांक 17,181 अंकांवर खुला झाला होता. यातील आयटी आणि फार्मा क्षेत्राच्या निर्देशांकाने घसरण नोंदवली. बँक, ऑटो, वित्तसेवा, एफएमसीजी, मीडिया, धातू, रियल्टी निर्देशांक अल्पशा तेजीसह कार्यरत होते.
मल्टीप्लेक्स क्षेत्रातील पीव्हीआर आणि आयनॉक्स यांचे विलीनीकरण झाल्यानंतरच्या बातमीने सुरूवातीच्या सत्रात दोन्हीचे समभाग अनुक्रमे 5 आणि 16 टक्के वाढीसह कार्यरत होते. निफ्टीतील 11 क्षेत्रांच्या निर्देशांकात आयटी आणि फार्मा निर्देशांक घसरणीसह बंद झाले. एफएमसीजी आणि बँक क्षेत्राच्या निर्देशांकांनी तेजी राखली होती. माध्यम क्षेत्राचा निर्देशांक तसेच रियल्टी क्षेत्राचा निर्देशांकही वाढीसह कार्यरत होता.
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील बाजार घसरणीत होते. युरोपीय बाजारात मात्र तेजी होती. आशियाई बाजारांचा विचार करता निक्केई 205 अंकांसह घसरणीत तर हँगसेंग 280 अंकांसह आणि शांघाई कम्पोझीट 2 अंकांसह तेजीत होता. कोस्पी मात्र अल्पशा घसरणीत होता.









