जागतिक बाजारातील सकारात्मक संकेताचा फायदा – निफ्टी 14 हजारावर
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअर बाजारामध्ये तिसऱया दिवशी बुधवारी तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांच्यात मजबूत स्थिती राहिली होती. बुधवारच्या सत्रात प्रथमच सेन्सेक्सने 50,000 चा यशस्वी टप्पा गाठला आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेताचा लाभ बाजाराला झाल्याचे दिसून आले.
चौफेर नफा कमाईमुळे बाजारात मजबूत स्थिती राहिली आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 458.03 अंकांनी वधारुन निर्देशांक 50,255.75 वर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स काही काळ 50,526.39अंकांच्या विक्रमी स्तरावर कार्यरत राहिला होता. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 142.10 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 14,789.95 टक्क्यांचा विक्रम नोंदवत बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 8 टक्क्यांनी नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प., डॉ. रेड्डीज लॅब, सन फार्मा, एनटीपीसी आणि ऍक्सिस बँक यांच्या समभागांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. दुसरीकडे मात्र अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, कोटक बँक आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
चालू आठवडय़ात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावर राहिल्याच्या कारणास्तव शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत होत तो वाढला असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. आगामी काळातही शेअर बाजाराचा प्रवास आणखी वेगाने वाढत जाण्याचे संकेत असून गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीकडे कल सकारात्मक राहणार असल्याचे मत उद्योगक्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.
भारतीय बाजाराचे भांडवल
सदरच्या तेजीसोबत भारतीय बाजाराचे भांडवल जवळपास 2,00,000 अब्ज रुपयांच्या टप्प्यावर पोहोचण्याच्या जवळपास आहे. आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्की हे लाभात राहिले आहेत. शांघाय कंम्पोझिटचा निर्देशांक नुकसानीत राहिला आहे.








