मुख्यमंत्री प्रमोद सावंत : पर्वरीत नवीन डायलॅसीस विभागाचे उद्घाटन
प्रतिनिधी / पर्वरी
जनतेच्या आरोग्याबाबत सरकार निश्चितच जागरूक आहे. आरोग्यसेवेत आमुलाग्र बदल घडवून सर्वांना सोयीनुसार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी सुपर स्पेशालिटी इस्पितळाशी भागीदारी करण्यास सरकार उत्सुक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
आर. जी. युरॉलॉजी ऍण्ड लेप्रोस्कोपी इस्पितळात नवीन डायलॅसीस विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ अंजु, डॉ. हेगडे, डॉ नेमळे, डॉ, भोबे उपस्थित होते. दिवसेंदिवस डायलॅसीस रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेह, किडनी यासारखे रोग लोकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. एकदा डायलॅसीसची सुरुवात झाली म्हणजे त्याच्यावर इलाज करणे मुश्किल होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘हिरवा गोवा स्वच्छ गोवा’ हे सरकारचे उद्दिष्ट असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जनतेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ, सावंत यांनी केले. प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने डायलॅसीस विभागाचे उद्घाटन केले. यानंतर डॉ. महावीर यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.









