किणये /वार्ताहर
तत्कालिन सरकारने 1986 साली बेळगावात कन्नड सक्ती लागू केली. या कन्नड सक्तीला सीमाबांधवांनी प्रखर विरोध केला. कन्नड विरोधी आंदोलनात बेळगुंदी येथील भावकू चव्हाण, मारुती गावडा, कल्लाप्पा उचगावकर हे दि. 6 जून 1986 रोजी हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना बेळगुंदी येथे शनिवारी सकाळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
गेल्या 64 वर्षांपासून लोकशाहीमार्गाने सीमाप्रश्नाचा लढा सुरू आहे. सीमा आंदोलनात अनेकांनी लाठय़ा खाल्ल्या, तुरुंगवास भोगला आणि हुतात्मेही झाले आहेत. या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी केला.
आम्हाला आमची मातृभाषा टिकवायची आहे
सीमा आंदोलनासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. सीमाप्रश्नाच्या लढय़ात आता चौथी पिढी सक्रिय झाली आहे. लोकशाहीमार्गाने चाललेल्या या लढय़ाला नक्कीच यश येणार आहे. आपण रस्त्यावरील लढाई चालूच ठेवली पाहिजे. आमच्या शेतकरी, कामगार बांधवांना सरकारी अधिकारी केवळ कानडी भाषेमध्ये माहिती देतात. कानडी भाषेचा आम्हाला मुळीच द्वेष नाही. मात्र आम्हाला आमची मातृभाषा टिकवायची आहे. आम्हाला महाराष्ट्रात सामील व्हायचे आहे, ही आमची मागणी आहे, असे मनोगत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी व्यक्त केले.
कर्नाटक सरकार सातत्याने सीमाबांधवांवर कानडीकरणाचा वरवंटा चालविते. सीमालढय़ाला बळकटी देण्यासाठी आम्ही सर्वांनी एकसंघ राहणे गरजेचे आहे. येणाऱया तरुण पिढीमध्ये सीमाप्रश्नाबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही सीमाप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे माजी आमदार बी. आय. पाटील यांनी बोलताना सांगितले.
बेळगुंदी गावातील तिघांनी सीमाप्रश्नासाठी बलिदान दिले आहे. याची जाण या भागातील प्रत्येक सीमाबांधवाने ठेवली पाहिजे. ज्यावेळी कन्नड सक्ती आंदोलन झाले, हे सर्व आंदोलन मी डोळय़ांनी पाहिले आहे. आजपर्यंत आम्ही सीमाप्रश्नासाठी एकनि÷sने योगदान दिले आहे. आता सीमाप्रश्नाचा लढा सध्याच्या तरुणांनी आपल्या खांद्यावर घेण्याची गरज आहे, असे मनोगत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हात्रू झंगरुचे यांनी व्यक्त केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर बी. आय. पाटील यांनी श्रीफळ वाढविले. दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘अमर अमर रहै, हुतात्मे अमर रहै’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी यल्लाप्पा बेळगावकर, सोमाण्णा गावडा, धुळाप्पा गावडा, यशवंत मोरे, परशराम पाटील, तानाजी पाऊसकर, अनिल गावडा, देवाप्पा शिंदे, रवळू मुगुटकर, सुनील पाटील, शट्टुप्पा चव्हाण, भरमा पाटील, सुरेश काशिद, विश्वनाथ चव्हाण, जोतिबा सुतार, लक्ष्मण भडांगे, जोतिबा उचगावकर, महादेव हिंडलगेकर, भरमू बेटगेरीकर, वैजू बागिलगेकर, प्रकाश हुबळीकर, श्रीधर पाटील, पुंडलिक मोरे आदी उपस्थित होते.









