कोरोना योद्धय़ा रसिका धुमाळे सांगताहेत अनुभव : मुंबईच्या ‘जे. जे.’ हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
कणकवली शहरातील रहिवासी व सध्या मुंबईत जे. जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या रसिका शांतीलाल धुमाळे या गेल्या दीड महिन्यापासून कोरोना योद्धय़ाच्या भूमिकेत सेवा बजावत आहेत. 15 दिवसांच्या डय़ुटीनंतर सात दिवस हॉस्टेलवर क्वारंटाईन केले जाते. मात्र, दीड महिन्यांपासून घरी जाताच आलेले नाही. घरी सासू, सासरे, पती व 10 वर्षांचा मुलगा, सात वर्षांची मुलगी आहे. मात्र, दीड महिना मुलांना भेटता आलेले नाही. फोनवर मुलं भेटण्यासाठी रडतात. पण कोविड विरुद्धच्या या लढय़ात त्यांना भेटणे शक्य नसल्याचे धुमाळे सांगतात.
मूळ कणकवली शहरातील रहिवासी असलेल्या रसिका शांतीलाल धुमाळे (रसिका विशाल कोल्हापूरे) या गेल्या पाच वर्षांपासून जे. जे. हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून सेवा बजावत आहेत. जे. जे.मध्ये सध्या कोविडसाठी पाच स्पेशल वॉर्ड करण्यात आले आहेत. कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांवर तेथे मोठय़ा प्रमाणात उपचार सुरू आहेत. जे. जे.मध्येही पॉझिटिव्ह रुग्णांचा भरणा आहे. पाचही वॉर्डमध्ये मोठय़ा संख्येने रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याच कोविड स्पेशल वॉर्डमध्ये श्रीमती धुमाळे यांची डय़ुटी आहे.
आपल्या लहान मुलांना दीड महिना भेटले नाही!
धुमाळे म्हणाल्या, कोविडच्या वॉर्डात आम्हाला सध्या रोटेशन पद्धतीने डय़ुटी देण्यात आलेली आहे. सलग 15 दिवसांच्या डय़ुटीनंतर आम्हाला सात दिवस सुट्टी दिली जाते. मात्र, या सुट्टीच्या कालावधीत आमची सोय हॉस्टेलवर करण्यात आलेली आहे. आम्हाला या सुट्टीमध्ये घरी जाता येत नाही. मुलांना, घरच्यांना भेटता येत नाही. सात दिवस आम्ही हॉस्टेलवर क्वारंटाईनच असतो. त्यानंतर पुन्हा आठव्या दिवशी आमची डय़ुटी सुरू होते. गेल्या दीड महिन्यापासून अशा पद्धतीने काम सुरू आहे.
मुले मला भेटण्यासाठी रडतात पण..
यातही एक जमेची बाजू म्हणजे पती कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्समध्ये आहेत. त्यांना सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने ते घरी आहेत. आपले वृद्ध सासू, सासरे व दोन्ही मुलांसोबत ते असल्याने थोडी काळजी कमी झाली असली, तरीही घरच्यांना भेटण्याची ओढ आहे. मात्र, या साऱया परिस्थितीत ते कधी भेटता येईल हे सांगता येत नाही. मुले भेटण्यासाठी रडत असतात, असे धुमाळे यांनी सांगितले.
घरच्यांची ओढ असली, तरी डय़ुटी फर्स्ट
डय़ुटीसाठीचे अत्यावश्यक साहित्य, किट पुरविले जात आहे. मात्र, डय़ुटी करताना डिलिव्हरी वॉर्डमध्ये अनेक पॉझिटिव्ह महिलांची डिलिव्हरी होते. पॉझिटिव्ह डिलिव्हरीची संख्या सातत्याने वाढताना दिसते. याबाबत अत्यावश्यक काळजी घेत सर्व जबाबदारी आम्ही पार पाडत असलो, तरीही घरच्यांची व गावची आठवण अशावेळी प्रकर्षाने जाणवते. सद्यस्थितीत आम्ही कोविड योद्धय़ा म्हणून ही जबाबदारी उचललेली आहे. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. घरच्यांना भेटण्यासाठीची ओढ कितीही असली, तरीही ‘डय़ुटी फर्स्ट’ या धोरणानुसार आमचे काम सुरू आहे, असे धुमाळे यांनी सांगितले.









