बेळगुंदी येथे कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन : कोरोनामुळे प्रातिनिधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती

वार्ताहर / किणये
गेल्या 65 वर्षांपासून सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे. सीमा आंदोलनात अनेकांनी लाठय़ा खाल्ल्या, तुरुंगवास भोगला आणि हौतात्म्यही पत्करले. या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही यासाठी सीमाप्रश्नाच्या लढय़ामध्ये आता सर्वांनी मिळून एकजुटीने कार्य करूया व सीमालढय़ाला बळकटी देऊन या प्रश्नासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया. न्यायदेवता आम्हाला नक्कीच न्याय देईल, अशी आशा आम्हा समस्त सीमाबांधवांना आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरणार आहे, असे मनोगत शिवसेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले.
1986 साली बेळगावात कन्नडसक्ती लागू करण्यात आली. या कन्नड सक्तीला सीमाबांधवांनी प्रखर विरोध केला. या आंदोलनात बेळगुंदी गावातील भावकू चव्हाण, मारुती गावडा, कल्लाप्पा उचगावकर हे दि. 6 जून 1986 रोजी हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना रविवारी सकाळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगुंदी ग्रामस्थ व शिवसेनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे व रविवारी विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याने तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सर्वांनी घरी राहूनच हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे आवाहन केले होते. काही मोजक्मयाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरुपामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणेच रविवारी सकाळी बेळगुंदीतील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी भावकू चव्हाण, मारुती गावडा व कल्लाप्पा उचगावकर या हुतात्म्यांच्या फोटो प्रतिमेला बेळगुंदी गावच्यावतीने ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष सोमाण्णा गावडा यांच्या हस्ते पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर नरेश दातार, नाना कंग्राळकर, शट्टुप्पा चक्हाण, देवाप्पा शिंदे, रवळू मुगुटकर, सुरेश काशिद, विलास बेळगावकर, डॉ. साठे, जोतिबा उचगावकर, धुळोबा गावडा, अनुराग गावडा, सुनील गावडा आदींच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
कर्नाटक सरकार सातत्याने सीमाबांधवांवर अन्याय करीत आहे. मराठी बहुभाषिक भाग असतानाही कन्नडसक्ती करण्यात येते. सरकारला सीमाबांधवांची ताकद दाखवून देण्यासाठी सीमाप्रश्नाच्या लढय़ात आता सर्वांनी सामील होण्याची गरज असून समितीच्या झेंडय़ाखाली सर्वांनी एकत्र येण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
प्रशासनाच्या नियमावलींचे पालन करत साधेपणाने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. पहिल्यांदाच कोरोना महामारीमुळे घोषणा देण्यात आल्या नाहीत. मात्र, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ असा भाव मात्र प्रत्येक सीमाबांधवांच्या मनात आजही कायम तेवत आहे.
शिवसेनेतर्फे प्रकाश शिरोळकर यांनी हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजू तुडयेकर, राजकुमार बोकडे, तानाजी पावशे, निलेश इंगळे आदींसह यल्लाप्पा बेळगावकर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी सामाजिक अंतर ठेवले होते. तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.
वडीलधाऱयांचा त्याग मोठा
दरवषी 6 जून रोजी बेळगुंदी गावातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी तालुक्मयातील सीमाबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित राहत असतात. यंदा कोरोना असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी घरात राहूनच हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे आवाहन तालुका म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले होते. बेळगुंदी गावातील तीन हुतात्म्यांनी दिलेले बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. सीमाप्रश्नासाठी तालुक्मयातील वडीलधारी मंडळींनी मोठा त्याग केलेला आहे. लाठय़ा खाल्लेल्या आहेत, तुरुंगवास भोगलेला आहे, या साऱयांचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर सर्वांनी पुन्हा एकदा मिळून सीमालढय़ाला बळकटी देण्याचे कार्य करू, असे तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी सांगितले.









