मदतीसाठी संपर्क साधण्याचे आयुक्तांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात पावसाला सुरुवात झाली असून कोरोनापाठोपाठ आता पूर स्थितीची धास्ती शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, या कालावधीत शहरवासियांच्या मदतीसाठी महानगरपालिकेने कंट्रोल रूमची स्थापना केली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास नागरिकांनी महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले आहे.
पावसाळय़ात शहरातील विविध भागात नाल्यांचे पाणी शिरते. याचा फटका शहरवासियांना सोसावा लागतो. शहराच्या मध्यवर्ती भागातून तसेच उपनगरांमधून विविध नाले वाहतात. पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास नाल्यांचे पाणी काठावरील घरांमध्ये शिरते. शहरामध्ये ही समस्या दरवषी निर्माण होत असते. काही सखल भागात पावसाचे पाणी शिरून शहरवासियांना घरांमध्ये अडकून राहावे लागते. अशा अडचणींच्या वेळी मदत करण्यासाठी महानगरपालिकेने दक्षिण आणि उत्तर विभागांसाठी दोन पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विभागासाठी विविध अधिकाऱयांची नियुक्ती करून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येते. पण यंदा कोरोनाचा प्रसार वाढल्याने महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांवर विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्षाची स्थापना करून नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर नियंत्रण कक्ष नागरिकांच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध असून मोबाईल 94815 04229, 0831-2405337 आणि 0831-2405316 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









