मियामी
मियामी महिला आणि पुरूषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूषांच्या विभागात इटलीच्या यानिक सिनेरला विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. दरम्यान महिलांच्या विभागात अमेरिकेची कोको गॉफने पुढील फेरीत प्रवेश मिळविला. ब्रिटनच्या कॅमेरून नुरीने पुरूष विभागात आपला खणखणीत विजय नोंदविला.
पुरूष विभागातील रविवारी येथे झालेल्या तिसऱया फेरीतील सामन्यात इटलीच्या यानिक सिनेरने स्पेनच्या पाब्लो बुस्टाचा 5-7, 7-5, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 11 व्या मानांकित सिनेरने या सामन्यात 15 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. सिनेरचा पुढील फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाच्या किर्गिओसशी होणार आहे. किर्गिओसने इटलीच्या फॉगनेनीचा 6-2, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. ब्रिटनच्या कॅमेरून नुरीने फ्रान्सच्या गॅस्टोनचा 6-3, 7-5 त्याचप्रमाणे कास्पर रूडने बुबलीकचा 6-3, 6-2 असा पराभव केला.
महिलांच्या विभागात अमेरिकेच्या कोको गॉफने स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवताना चीनच्या शुईचा 7-6 (7-1), 7-5 त्याचप्रमाणे स्पेनच्या सातव्या मानांकित बेडोसाने कझाकस्तानच्या पुतीनसेव्हाचा 6-3, 6-2, झेकच्या 16 वर्षीय प्रुव्हर्टोवाने बेलारूसच्या अझारेंकाचा 6-2, 3-0 असा पराभव केला. दुखापतीमुळे अझारेंकाने हा सामना अर्धवट सोडला.









